आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून अकोला येथील काळभैरव मंदिरास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा...
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील अकोला येथील श्री काळभैरव मंदिर देवस्थानास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग अंतर्गत ब वर्ग दर्जा देण्याबाबत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून शासन निर्णय जाहीर झाला आहे. श्री काळभैरव देवस्थानास ब वर्ग दर्जा देण्याबाबत आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हा दर्जा मिळवून दिला आहे.
या निर्णयामुळे भाविकांसाठी आवश्यक सुविधा, देवस्थानचा सर्वांगीण विकास तसेच स्थानिक पर्यटनाला नवी चालना मिळणार असून परिसराच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीस नक्कीच मोठी मदत होणार आहे. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरवाची पवित्र भूमी असलेल्या असलेल्या देवस्थानाला मिळालेला हा मान संपूर्ण मंगळवेढा तालुक्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाची बाब आहे. सदर 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र’ दर्जा मिळाल्यामुळे संस्थेचा केवळ भौतिक विकासच नव्हे, तर भाविकांकरिता सोयी-सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. हा निर्णय म्हणजे भाविकांच्या दीर्घकाळच्या अपेक्षांना दिलेला प्रतिसाद असून शासनाने श्रद्धा आणि विकास या दोन्हीचा समतोल साधला आहे अशी भावना आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली आहे.
हा महत्त्वपूर्ण व दूरदृष्टीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी राज्याचे माननीय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.