वाढदिवसाचा आनंद दिवगुणीत..! भाजप जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली आलिशान फोर्च्यूनर गिफ्ट; जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांना विधानपरिषदेवर घेण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
भारतीय जनता पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे चीज होते, हे वारंवार दिसून आले आहे. तब्बल ३२ वर्षे भाजपचे काम केल्यानंतर मंगळवेढ्याचे शशिकांत चव्हाण यांच्यासारख्या तळागाळातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पक्ष सत्तेवर आलेला असताना शशिकांत चव्हाण यांना हे वलयाकिंत पद मिळाले. पण, आज वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी शशिकांत चव्हाण यांना आलिशान फोर्च्युनर गाडी भेट देऊन त्यांचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला आहे.दरम्यान, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांना आता विधानपरिषदवर आमदार म्हणून संधी देण्यात यावी अशी मागणी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केली आहे.
मंगळवेढा शहरातील सांगोला नाका येथे काल भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फोर्च्युनर गाडीची चावी जिल्हाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, उद्योजक शंकर जाधव, तालुकाध्यक्ष आंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दिगंबर यादव, सत्यजित सुरवसे, युवा मोर्चाचे सुदर्शन यादव, आदित्य हिंदुस्तानी, सुशांत हजारे आदीसह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शशिकांत चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात 1992 पासून काम करण्यास सुरुवात केली. तब्बल 32 वर्षे पक्षासाठी केलेल्या कामाच्या निष्ठेचे फळ जिल्हाध्यक्ष रूपाने शशिकांत चव्हाण यांना मिळाले.सुरुवातीला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले, त्यानंतर मंगळवेढा शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले. तब्बल सहा वर्षे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले.
याशिवाय, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तीन वर्षे, जिल्हा सरचिटणीस पदावर तीन वर्षे, जिल्हा संघटन सरचिटणीस पदावर तीन वर्षे असे पक्षासाठी तब्बल 32 वर्षे रात्रंदिवस काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती नुकतीच जिल्हाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सांगोला नाका येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात आज भाजप समर्थकांनी दिवसभर गर्दी केली होती.
भाजप कार्यकर्ता कोणत्याही पदाचे स्वप्न पाहू शकतो : शशिकांत चव्हाण
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये कार्यकर्ता कोणत्याही पदाची स्वप्न बघू शकतो. मात्र, त्यासाठी पक्षात झोकून देऊन केलेले काम ओळखून पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पक्षामुळे आपला सन्मान वाढला. वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे पक्षासाठी आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी स्पष्ट केले.