मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा शहरातील दामाजी चौकात एक अडीच वर्षीय बालिका फिरताना मिळून आल्याने तिच्या पालकांना पोलीसांनी केवळ व्हॉटसअपच्या माध्यमातून अर्ध्या तासात शोध घेवून कुटूंबियाच्या ताब्यात दिले.
या घटनेची हकीकत अशी,दि.4 रोजी सायंकाळी 7 वाजता दामाजी चौकातील श्री संत दामाजी पुतळ्याजवळ अशीया नामक अडीच वर्षीय मुलगी सैरावैरा फिरत असल्याचे नंदा गायकवाड व शुभांगी गायकवाड या दोघींच्या निदर्शनास आले. या दोघी पंढरपूरहून बसमधून उतरुन मंगळवेढा शहरात जात असताना या दोघींची नजर त्या बालिकेकडे गेली.
तिला मायेने जवळ घेवून वडिलाचे नाव,आईचे नाव विचारले असता ती केवळ एकच शब्द बोलत असल्याने आई,वडिलाविषयी माहिती मिळू न शकल्याने त्यांनी त्या बालिकेला मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुकर,पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर,गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे,ठाणे अंमलदार कृष्णा जाधव, महिला पोलीस हवालदार वंदना अहिरे आदींनी सदर मुलीचे फोटो काढून शहरातील सर्व व्हॉटसअप ग्रुपवर टाकल्यानंतर त्या मुलीच्या पालकांचा शोध लागला.
सदरची मुलगी आई,वडिला बरोबर एका कार्यक्रमस्थळी आली होती. आई,वडिल कार्यक्रमात असताना नजर चुकवून ती मुलगी रस्त्यावर आली व रोडने ती फिरत फिरत दामाजी चौका पर्यंत येवून पोहचली. सदर मुलीच्या वडिलाने पोलीस स्टेशन मध्ये येवून मुलीची ओळख सांगीतल्यानंतर पोलीसांनी त्या बालिकेला त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर आई वडिलाचा जीव भांड्यात पडला. सदर मुलीच्या वडिलाचे नाव अक्रम अब्बास मुलाणी (रा.मुलाणी गल्ली) असल्याचे सांगण्यात आले.