मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील ज्ञानेश्वरी गडदे हिच्या मृत्यूला जबाबदार आरोपींवर अद्यापही कठोर कारवाई झालेली नाही. आरोपी मोकाट फिरत असल्याने पीडित कुटुंबाचे हाल अधिकच वाढले आहेत. न्याय मिळावा, दोषींना शिक्षा व्हावी, या आशेने ते दररोज प्रशासनाच्या दाराशी भटकत आहेत. ज्ञानेश्वरीच्या अचानक मृत्यूने संपूर्ण गाव हादरले होते. घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही तपास ढिम्मच गतीने सुरू आहे. आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल असूनही ते सर्रास गावात वावरत असल्याने कुटुंबासह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.
पीडित कुटुंबातील सदस्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून न्याय मिळावा, अशी हाक दिली आहे. "आमच्या लेकराचे प्राण गेले, पण दोषींवर अद्यापही कारवाई झाली नाही. आरोपींचा राजकीय पाठिंबा असल्याने ते मोकाट आहेत. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही मोठे आंदोलन उभारू," असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.दरम्यान, गावातील नागरिकांनीही प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. "अशा प्रकारे गुन्हेगारांना संरक्षण मिळत असेल तर साध्या नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल," अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सध्या संपूर्ण परिसरात या घटनेची चर्चा असून, सर्वांचे डोळे आता पोलिस व प्रशासनाकडे लागले आहेत. न्यायाची आस लागलेले कुटुंब अजूनही आरोपींना कायद्याच्या कचाट्यात खेचले जाईल, याची प्रतीक्षा करत आहे.मंगळवेढ्यातील ज्ञानेश्वरी उर्फ पायल हिच्यावर सासरच्या मंडळींकडून अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असतानाही मुख्य आरोपींना अजूनही अटक झाली नसल्याने पीडित कुटुंब न्यायासाठी तडफडत आहे. ज्ञानेश्वरीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “आमच्या मुलीवर सासरच्या लोकांनी भयंकर मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ केला. तिचे कोमल आयुष्य उद्ध्वस्त केले.
तरीदेखील मुख्य आरोपी शोभा शिवाजी गडदे, समाधान शिवाजी गडदे व शिवाजी काशिनाथ गडदे हे अजूनही मोकाट फिरत आहेत.
आरोपींना राजकीय व आर्थिक पाठबळ असल्यामुळे पोलिस मुद्दाम उडवा-उडवी करत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मंगळवेढा पोलिसांकडून फक्त तपास सुरू आहे, शोधतो आहोत अशी उत्तरे दिली जातात. यामुळे अन्यायग्रस्त कुटुंबाचे मनोबल खचले आहे. “न्याय मिळाला नाही तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल. याला जबाबदार मंगळवेढा पोलीस स्टेशन असेल,” अशी गंभीर चेतावणी कुटुंबीयांनी दिली आहे.या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उच्च अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा सुरू ठेवू, असा निर्धार कुटुंबाने व्यक्त केला आहे.