हुलजंती येथील पडक्या घराच्या छतावरुन मुद्देमाल पोलीसांनी केला जप्त
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
चडचण शहरातील एस.बी आय बँकेवर मिलट्री ड्रेस परिधान करुन आलेल्या शस्त्रधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकून तो मुद्देमाल मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हुलजंती येथे एका पडक्या घराच्या छतावर ठेवल्याचे निदर्शनास येताच चडचण पोलीस व मंगळवेढा पोलीस यांनी सदर घटनास्थळी जावून त्या मुद्देमालाचा पंचनामा करुन तो मुद्देमाल गुन्ह्याच्या पुराव्याकामी जप्त करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
या घटनेची हकीकत अशी,मंगळवार दि.१६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान ८ मुखवटा घातलेले व मिलट्री ड्रेस परिधान करुन पिस्तुल व धारधार शस्त्राचा धाक दाखवित बँकेतील कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून धाडसी दरोडा दरोडेखोरांनी टाकला होता. अंदाजे यामध्ये ८ कोटीची रोख रक्कम व ५० किलो सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली होती. चडचण शहरापासून अवघ्या १० ते १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हुलजंती येथे एका पडक्या घराच्या छतावर या दरोड्यातील मुद्देमाल असलेली बॅग पोलीसांना मिळून आली.
सदर घटनास्थळी चडचण पोलीस व मंगळवेढ्याचे डी.वाय. एस.पी.डॉ.बसवराज शिवपूजे यांनी घटनास्थळी भेट देवून तपासकामी पथकाला मदत करुन गुन्ह्याच्या पुराव्याकामी तो मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यासाठी मंगळवेढा पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे व हुलजंती बीटचे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.