पती, सासू,सासरा,दीर या चौघाविरूध्द गुन्हा दाखल...
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही, तसेच तू माहेरहून पैसे घेवून ये या कारणास्तव ज्ञानेश्वरी दिपक गडदे (वय २० वर्षे) विवाहित तरुणीस मानसिक त्रास देवून क्रुरपणे वागविल्याप्रकरणी जाचहाटास कंटाळून तिने बेडरुमच्या छताला हुकास ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याप्रकरणी शोभा शिवाजी गडदे, शिवाजी काशिनाथ गडदे, समाधान शिवाजी गडदे, दिपक शिवाजी गडदे (सर्व रा.गडदेवस्ती रा.नंदेश्वर) या चौघाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी किसन सोमा मासाळ (रा.मासाळवस्ती, गोणेवाडी) यांची मयत मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह नंदेश्वर येथील दिपक गडदे यांच्यासोबत २७ मे २०२४ मध्ये झाला होता. लग्न झाल्यापासून तिचे सासरे, तिचे पती, सासू, दीर, आजत सासू,आजत सासरे यांच्यासह एकत्रीत राहण्यास होते. मयत ज्ञानेश्वरी हिस वरील आरोपी तुझ्या आई वडिलाने लग्नात काहीही दिलेले नाही असे म्हणत असे, याबाबत मयत हिने घरच्या आई वडिलांना बोलून दाखविले होते. त्यावरुन तिला नेहमीच मानसिक त्रास देत होते. तुझ्या वडिलांकडून पैसे घेवून ये असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करीत होते.
त्यावेळी मयत ही आमच्या वडिलाकडची परिस्थिती हालाकीची असल्याने नेहमी सांगत नव्हती. ती गप्प बसत असल्याने तिला विश्वासात घेवून तिच्या वडिलाने विचारले असता तिने वरीलप्रमाणे हकीकत सागीतली. या दरम्यान मयत हिस तिच्या वडिलाने समजूत घातली होती. त्याचबरोबर ज्ञानेश्वरीच्या सासरच्या लोकांनाही समजावून सांगीतले होते तरी सुद्धा सासरकडील लोक ज्ञानेश्वरीस त्रास देत होते. दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११:४५ वाजता फिर्यादी हे गोणेवाडी येथील घरी असताना मयताच्या दीराने मोबाईलवरुन कॉल केला. त्यांनी सांगीतले की तुमची मुलगी ज्ञानेश्वरी हिची तब्बेत बिघडली आहे, तिला चक्कर आली आहे तुम्ही लवकर या असे कळविले. त्यावर लागलीच फिर्यादीने फिर्यादीची पत्नी सत्यभामा हिला माहिती कथन करुन दुचाकीवर ते १२:३० वाजता ज्ञानेश्वरी हिच्या घरी आले. येथे पाच ते सहा लोक जमा झाले होते.
फिर्यादीची मुलगी ज्ञानेश्वरी झोपलेल्या अवस्थेत तिचे डोके जावई दिपक गडदे यांच्या मांडीवर ठेवलेल्या स्थितीत होते. जावई रडत होता मात्र मुलगी ज्ञानेश्वरी हिची कोणतीही हालचाल होत नव्हती. मुलीच्या गळ्याला काळपट वृण पडलेला दिसला. उपस्थित लोकांकडून फिर्यादीस समजले की मुलगी ज्ञानेश्वरी हिने घरातील बेडरुम मध्ये छताला असलेल्या लोखंडी हुकास ओढणीने बांधून गळफास घेतला असल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान नवतरुण विवाहितेने गळफास घेतल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.