कौतुकास्पद ! मंगळेवढा पोलीसांना सहा जणांचे मोबाईल शोधण्यात यश
मंगळवेढा /प्रतिनिधी:-
मंगळवेढा पोलीसांनी पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेल्या सहा व्यक्तींचे स्मार्ट फोन विविध तांत्रिक बाबींचा उपयोग करुन शोधण्यात त्यांना यश आले असून हे सहा मोबाईल संबंधीत व्यक्तींना देण्यात आले आहेत.दरम्यान या कामगिरीमुळे मोबाईल हरवलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर आंनद दिसून येत आहे.
मंगळवेढा पोलीस ठाणे हददीत श्रीशैल मलगोंडा (रा.डोणज) ,शुभम पाटील (रा.मुढवी),संतोष घुगे (रा. गोणेवाडी),अनिल पाराध्ये (रा.ब्रम्हपुरी), बजरंग लेंडवे (रा.फटेवाडी), राजेश्वरी बेदरे (रा.बठाण) आदी सहा लोकांचे स्मार्ट फोन गहाळ झाले होते.या बाबतची तक्रार संबंधीतांनी मंगळवेढा पोलीसात नोंदवली होती.
याचा शोध डी.वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी विविध तांत्रिक बाबींचा उपयोग करुन पोर्टल व्दारे त्याचा सोलापूर जिल्हयात व इतर राज्यातून शोध घेवून सहा जणांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. वरील सहा जणांना गूरुवार दि.११ रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आले आहेत. या विशेष कामगिरीचे सर्वसामान्य नागरिकांनमधून कौतुक होत आहे.