मंगळवेढा (प्रतिनिधी):-
मंगळवेढा पोलिस ठाण्यात भरविण्यात आलेल्या तक्रार निवार दिनामध्ये शहर व ग्रामीण भागातून १७५ तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते.दरम्यान मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व बीट निहाय अंमलदार यांच्या सहकार्यातून ९२ तक्रारी अर्ज निकाली काढण्यात यश प्राप्त झाले आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा कार्यभार घेतल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींना स्थानिक पातळीवर योग्य न्याय मिळावा या उदात्त हेतूने प्रत्येक शनिवारी जिल्हयातील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये तक्रार निवारण दिन म्हणून घेण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे दि.२३ ऑगस्ट रोजी मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे १७५ तक्रारी अर्ज मंगळवेढा शहर बीट, मंगळवेढा ग्रामीण बीट, बोराळे दुरक्षेत्र, नंदेश्वर दूरक्षेत्र, हुलजंती दुरक्षेत्र, लक्ष्मी दहिवडी बीट आदी सहा बीटमधून हे अर्ज प्राप्त झाले होते.
पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद लातूरकर, पोलिस उपनिरिक्षक विजय पिसे, नागेश बनकर, पोलिस हवालदार दिगंबर गेजगे, पोलिस हवालदार मनोज खंडागळे, श्रीमंत पवार,योगेश नवले यांचेसह सर्व बीट अंमलदार यांच्या मदतीने या अर्जाचा निपटारा करण्यात आला.
दरम्यान प्रामुख्याने पैसे, शेती, घरगुती असे वाद यामध्ये मोठया संख्येने असल्याचे निदर्शनास आले.येथील महिला समुपदेशन केंद्राच्या विभावरी कसबे, वैशाली गायकवाड आदींनी यामध्ये पती पत्नीचा एक वाद संपविला.प्रथमच समुपदेशन केंद्र या तक्रार निवारण दिनामध्ये सामील झाले होते.