मंगळवेढा (प्रतिनिधी) :-
मंगळवेढा-पंढरपूर पालखी मार्गावर वारी प्रसंगी वारकर्यांना सावली मिळावी या उदात्त हेतून सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी नुकतेच महामार्गालगत वृक्षारोपण करुन एक चांगला संदेश दिला आहे.
पंढरपूरला आषाढी व कार्तिकी या दोन मोठ्या वारी भरत असल्याने कर्नाटक व विदर्भामधून येणार्या पालख्या या मंगळवेढा मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. पालखीतील वारकर्यांना थकल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी झाडाचा आश्रय घेता यावा यासाठी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी महामार्गावर वृक्षारोपण करण्याचा महत्वकांक्षी निर्णय यापुर्वीच घेतला असून बुधवार दि.20 रोजी मंगळवेढा-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वर वृक्षारोपण करण्यात आले.
यापुर्वीही दि.15 ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासन व वारी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पवार यांनी वृक्ष रोपे आजच्या कार्यक्रमाला पुरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला डी.वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सांगोल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संभाजी यादव,पत्रकार दिगंबर भगरे,उद्योजक शिवाजी पवार,उद्योजक संजय आवताडे,विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त ह.भ.प.शिवाजी मोरे व अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.