ग्रामदैवत लक्ष्मी देवी मंदिरासमोर महिलांना फेर धरला
मंगळवेढा/प्रतिनिधी:-
ग्रामीण भागात नागपंचमी पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. गावोगावी नागोबा देवालयासमोर किंवा ग्रामदैवत मंदिरासमोर महिलांना लोकगीतं म्हणत फेर धरला.
मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे श्रावण महिन्यातील नागपंचमी हा दिवस स्त्रियांसाठी मोठा सण आहे. या दिवशी स्रियानी घरीच नागाची मूर्ती बसवून किंवा भिंतीवर नागाचा फोटो लावून पूजा केली. मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात नागोबा ला जाऊनही दुध,लाह्या, पोहे , बेदाणे इत्यादी अर्पण करून पुजा करून पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यात आली. नागाच्या मूर्तीला हळद-कुंकू लावून, दुर्वा-फुले वाहून, लाहया व दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
या सणासोबत आणखी एक प्रथा जोडली गेलेली आहे, ती म्हणजे या दिवशी ठिकठिकाणी वारुळ पूजन करुन नागपंचमी साजरी करण्यात आली.अनेक ठिकाणी झोके बांधले होते. शहरी भागात ही प्रथा काहीशी लोप पावली असली तरी देखील ग्रामीण भागांमध्ये आजही सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमीच्या दिवशी झोके बांधले जातात. या सणाला विवाहित महिला आपल्या माहेरी येतात, या महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात, ही प्रथा आजही ग्रामीण भागांमध्ये सुरू आहे.
या दिवशी नागाची पूजा का करायची तर नागदेवता आपल्या कुळाचा, आपल्या शेताचा रक्षणकर्ता आहे म्हणून नागदेवाची पूजा करतात. त्या दिवशी पुरणाची कानोला बनवून नवेद्य बनवला जातो नागपंचमी या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लेवून निरनिराळे खेळ खेळतात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर हे खेळ खेळत,लोकगीतं म्हणत नागपंचमी सण साजरा केला.असाच फेर आज मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे ग्रामदैवत लक्ष्मी देवी मंदिरासमोर पहायला मिळाला.
यावेळी लहान मुलींपासून मोठया स्त्रिया सर्व खेळामध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.