खासदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य बालिश आणि असंस्कृत - आमदार समाधान आवताडे यांची खरमरीत टीका

खासदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य बालिश आणि असंस्कृत

- आमदार समाधान आवताडे यांची खरमरीत टीका 

मंगळवेढा /प्रतिनिधी :- 

देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपले सर्वस्व पणाला लावून देशसेवा करणाऱ्या सैनिकांप्रती अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करावा तेवढा कमीच असून त्यांचं हे वक्तव्य बालिशपणातून आणि राजकीय असंस्कृतपणाचे लक्षण आहे. ऑपरेशन सिंदूरचे सर्व जगाने कौतुक केले असताना, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या खासदार शिंदे यांना मात्र हा ‘तमाशा’ वाटतो हे, अतिशय खेदजनक आणि तितकेच चीड आणणारे आहे, अशी प्रतिक्रिया मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली. 

खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंधूरवर बोलत असताना केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आमदार आवताडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रणिती शिंदे यांचे हे वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा असून यानिमित्ताने तो संबंध देशासमोर आला आहे. सतत बरळत राहणे, हा शिंदे यांचा मूळ स्वभाव असल्याचेही अवताडे म्हणाले.

आवताडे पुढे म्हणाले की, ‘प्रणिती शिंदे यांची बौद्धिक कुवत आता सोलापूरकरांच्या लक्षात आली असून शिंदे यांच्या वक्तव्यामुळे सोलापूरकरांचे नाव देशभरात खराब झाले आहे. या लोकसभा मतदारसंघाचा मतदार म्हणून मला या गोष्टीचा निश्चितच खेद वाटतो. यापूर्वीही २४ गावच्या उपसा सिंचन योजनेला मंजुरी आणि निधीही मिळाला असताना लोकसभेच्या प्रचारात या योजनेला माझ्यामुळेच मंजुरी मिळाली, असे अक्कलशून्य वक्तव्य शिंदे यांनी केले होते. स्वतः दोनदा आमदार आणि आता खासदार तसेच वडिलांनी राज्याचे नेतृत्व केले, मात्र कोणतेही मोठे प्रश्न सोडवता तर आले नाहीत. शिवाय कुठलेही प्रकल्पही आणता आले नाहीत, त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न शिंदे यांचा आहे. 

‘खोटे बोला, पण रेटून बोला’, हा शिंदे यांचा स्वभाव असून आता देशाच्या सर्वोच्च सभागृहातही मुक्ताफळे उधळायला त्यांनी सुरुवात केली आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांप्रती बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे असते. मात्र दहा वर्ष आमदारकी भोगूनही याचे तारतम्य खासदारांना आले नाही, हे सोलापूरच्या मतदारांचे दुर्दैव आहे’, असेही आमदार आवताडे म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’ हा केवळ सैनिकी कारवाईचाच भाग नव्हता, तर देशातल्या प्रत्येक भगिनीच्या भावनांचाही विषय होता. म्हणूनच अशा विषयाची खिल्ली उडवणे, हे बेतालपणाचे लक्षण असून स्वतःची राजकीय संस्कृती आणि स्वतःच्या पक्षाचे विचार जगासमोर आणणारी कृती आहे, असेही आवताडे म्हणाले.

‘गेल्या अकरा वर्षांच्या काळात देशात आमुलाग्र बदल होत असताना भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उंचावत गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कामगिरी संपूर्ण काँग्रेस पक्षाला डोळ्यात खूपणारी असून मोदी विरोध करता करता, आता हे सैन्याचाही विरोध करू लागले आहेत, सोलापूरचा मतदार याबाबत नक्की विचार करेल, असेही आवताडे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.