उचेठाण येथील चोरी प्रकरणात पुतण्याच निघाला चोर; १ लाख २७ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

उचेठाण येथील चोरी प्रकरणात पुतण्याच निघाला चोर

१ लाख २७ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

मंगळवेढा /प्रतिनिधी :- 

उचेठाण येथील कुटुंबिय आदमापूर येथील बाळूमामाच्या दर्शनासाठी गेल्यावर घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा १ लाख २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडल्यानंतर एक २८ वर्षीय तरुण गावातून बेपता असल्याने पोलीसांनी त्या तरुणास शोधून ताब्यात घेतल्यावर चोरीचा गुन्हा कबूल केला असून पोलीसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

 पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी,यातील फिर्यादी नामदेव पितांबर लोखंडे (वय५५ रा.उचेठाण) हे दि.२६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता आदमापूर येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी गेले होते. दि.२७ रोजी सकाळी १० वाजता फिर्यादीची पत्नी लतिका लोखंडे ही जगताप वस्ती शाळेवर गेली होती. सायंकाळी ४ वाजता घरी आल्यावर घराचे कुलूप उघडे दिसले. देवदर्शन करुन फिर्यादी हे रात्री दहा वाजता घरी आले. दि.२८ रोजी माचणूर येथील श्री सिध्देश्वर यात्रा असल्याने कपाटात ठेवलेले पैसे घेण्यास गेल्यावर कपाटाचे लॉक तुटलेले दिसले.

त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीने सर्व कपाट चेक केले असता कपाटात ठेवलेले ९० हजार रुपये किंमतीचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याची पिव्याची अंगठी,१२ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने घराचे व कपाटाचे लॉक तोडून नेल्याची फिर्याद दाखल होती.

 पोलीसात गुन्हा दाखल झाल्यापासून फिर्यादीचा पुतण्या तथा आरोपी दिनेश अभिमान लोखंडे हा गावातून बेपत्ता असल्यामुळे त्याच्यावर संशय वाढत गेला. दि.१७ जुलै रोजी मंगळवेढा पसिरातन त्याला ताब्यात घेवून कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीचा गुन्हा कबूल करुन सर्व मुद्देमाल पोलीसासमक्ष हजर केला. 

सदर आरोपीला अटक करण्यात आली, ही कामगिरी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अंकुश वाघमोडे, ,पोलीस हवालदार , योगेश नवले, पोलीस अंमलदार महेश पोरे आदींनी केली. दरम्यान पोलीसांनी या चोरीचा तपास ज्या पध्दतीने लावला तसाच तपास अन्य झालेल्या घरफोड्यांचा लावावा अशी मागणी नागरिकामधून जोर धरीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.