मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर हत्याप्रकरणी खंडणीखोर व खुनी गुंडांना त्वरित अटक करावी असे निवेदन मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन मंगळवेढा येथे देण्यात आले बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओने त्यांच्या कारचा पाठलाग केल्याचे दिसून येत आहे. टोलनाक्याजवळ हल्ला करून त्यांचे अपहरण करण्यात आले आणि अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. पाच दिवस उलटून गेले तरी आरोपी अद्याप फरार आहेत. ९ डिसेंबरला भरदिवसा संतोष देशमुख यांच हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि जयराम माणिक, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.
या आरोपींमधील जयराम, महेश आणि प्रतीक हे तीन आरापी ताब्यात असून इतर चार आरोपी फरार आहेत. देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये केजचे पोलीस अधीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे पदभार सोपवला गेला आहे. पोलीस फरार आरोपींच्या मागावर असून त्यांचा शोध घेत आहेत.या आरोपींना त्वरित अटक व्हावी तसेच सूत्रधार असेल त्यालाही अटक व्हावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक विनोद लातूरकर यांना निवेदन देताना मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी वाकडे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष शरद हेंबाडे, माऊली कोंडुभैरी ,प्रकाश मुळीक ,राजेंद्र गणेशकर ,दत्तात्रय बेदरे ,विजय हजारे ,राहुल सावजी, प्रकाश दिवसे ,संभाजी घुले, सतीश दत्तू ,दिलीप जाधव, दत्तात्रय भोसले ,स्वप्निल निकम आनंद मुद्गुल ,प्रफुल्ल सोमदळे ,संदीप भोसले, मारुती गोवे आदीजण उपस्थित होते.