कर्मफळाची अपेक्षा न ठेवता श्री.गणेश विद्यालयाने केलेली शैक्षणिक सेवा म्हणजे शिक्षण क्रांतीचा परिपूर्ण अध्याय- अनिल मोरे

कर्मफळाची अपेक्षा न ठेवता श्री.गणेश विद्यालयाने केलेली शैक्षणिक सेवा म्हणजे शिक्षण क्रांतीचा परिपूर्ण अध्याय- अनिल मोरे 

गणेशवाडी (प्रतिनिधी):-

गेल्या २०वर्षांच्या कालखंडात लोटेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित,श्री.गणेश विद्यालय, गणेशवाडी या विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विनाअनुदानित तत्वावर केलेली प्रामाणिक आणि प्रेरक शिक्षण सेवा ही आपल्या जिल्ह्यातील शिक्षण क्रांतीचा परिपूर्ण आणि अतिशय संवेदनशील अध्याय व आदर्श असल्याचे प्रतिपादन माणुसकी फाऊंडेशन या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष तथा युवा उद्योजक अनिल मोरे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्यावतीने दिला जाणारा कृतिशील आदर्श शाळा पुरस्कार-:२०२४-२५ श्री.गणेश विद्यालय गणेशवाडी या विद्यालयास जाहीर झाल्याबद्दल माणुसकी फाऊंडेशन, गणेशवाडी यांच्यावतीने विद्यालयातील सर्व गुरुजन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा आदरपूरक सन्मान करुन आशीर्वाद घेण्यात आले. सदरप्रसंगी आपले मनोगत मांडताना ते बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाचे दिशादर्शक, विधायक अध्यापन कार्याचे प्रेरणास्रोत आणि मानवी मूल्यांचे विद्याकेंद्र म्हणून ख्यातकिर्ती संपन्न असलेले संस्कार पीठ म्हणजे आपले श्री.गणेश विद्यालय होय. निःस्वार्थ भाव मनी ठेवून केवळ आणि केवळ विद्यार्थी केंद्रीत अध्यपनाची अथक परिश्रमक्षमता, अतुलनीय ज्ञानप्रतिभा आणि अजोड बुद्धिमत्ता असा अदभूत त्रिवेणी संगम ज्यांच्या ठायी आम्हाला शिक्षण प्रवासादरम्यान अनुभवयाला मिळाला अशा विजिगिषु या सर्व गुरुवर्य व्यक्तिमत्त्वांना आणि त्यांच्या क्रांतिकारक कार्याला यावेळी फाऊंडेशन मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी साष्टांग सलाम केला.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी मुख्याध्यापक दत्तात्रय चुबुकनारायण, जेष्ठ सहशिक्षिका सुनंदा आवताडे, सहशिक्षक तानाजी दिघे, वसंत डावखर, शिक्षकेत्तर कर्मचारी सुभाष तानगावडे, रघुनाथ कदम, संतोष मोरे यांचा सत्कार करुन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सहशिक्षक तानाजी दिघे यांनी स्वागतपर सूत्रसंचालन केले तर प्राथमिक शिक्षण विभागाचे पदवीधर शिक्षक सर्जेराव रुपनर यांनी या भावनिक आणि आपुलकीप्रिय उपक्रमाचे कौतुक करुन सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ पदाधिकारी आंधळगाव शिक्षण केंद्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, क्रीडाशिक्षक, फाऊंडेशनचे पदाधिकारी-सदस्य व इतर युवा सहकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.