भाजपचे प्रांतिक सदस्य प्रा. लक्ष्मण ढोबळे यांची मागणी
महाराष्ट्रात बोगस दाखले मिळतात, त्याला आळा घालावा !
मंगळवेढा / सचिन हेंबाडे : -
गेल्या 40 वर्षात 5 वेळा आमदार म्हणून काम केले. तीन वेळा माझा लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. गेल्या 9 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीवर सदस्य म्हणून कार्यरत आहे. प्रदेश प्रवक्ता म्हणून जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. हिंदू दलित प्रवर्गातील अतिमागास प्रवर्गाचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभा राखीव मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपाकडे केली आहे, अशी माहिती माजी पालकमंत्री तथा भाजपाचे प्रांतिक सदस्य प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामाजिक समरसता व सामाजिक संधीची समानता आवश्यक आहे. दलितांमधील अति मागास वर्गातील दलित हिंदूंना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून 59 जातीमध्ये चर्मकार, मातंग, ढोर , होलार मोची, मेहतर अशा प्रमुख जातींचा अंतर्भाव होत असून हिंदू दलित सदराखाली गेल्या पन्नास वर्षात देशाच्या राज्यसभेत आणि राज्याच्या विधान परिषदेत अति मागास दलितांना नाममात्र संधी मिळाली आहे, अशी खंत प्रा. ढोबळे यांनी व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये विजापूर ते पंढरपूर व्हाया मंगळवेढा आणि सांगोला ते सोलापूर व्हाया मंगळवेढा असा रेल्वे ट्रॅक व्हावा.संत बसवेश्वर आणि संत चोखामेळा यांचे स्मारक व्हावे. मंगळवेढ्यातील 24 गावच्या प्रलंबित पाण्याचा प्रश्न सोडवावा यासह विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकसभा उमेदवारीची मागणी केली आहे. शेवटी श्रेष्ठींचा निर्णय अंतिम असल्याचेही यावेळी प्रा. ढोबळे यांनी स्पष्ट केले.
बोगस दाखल्यांना आळा घालावा
महाराष्ट्रात बोगस दाखले मिळतात, त्याला आळा घालण्याची गरज आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवारांना भाजप श्रेष्ठींनी संधी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, असेही प्रा.ढोबळे यांनी सांगितले.