काँग्रसकडून सोलापुरातून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी फायनल
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
काँग्रेसकडून शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी फायनल आहे. त्यामुळे दोन आमदारांमध्ये ही निवडणूक रंगणार असल्याचे मानले जात आहे. भाजपने माढ्याचा उमेदवार यापूर्वीच जाहीर केल्याने सोलापूरच्या उमेदवाराबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सोलापूरसाठी पद्मश्री मिलिंद कांबळे, माजी खासदार अमर साबळे ,उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत.
चार दिवसांपूर्वी सोलापूरच्या उमेदवाराबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत उमेदवार ठरवण्याचे सर्व अधिकारी या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या बैठकीत आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या नावाची चर्चा झाली होती. माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मोहिते-पाटील गट नाराज झाला आहे. या गटाने वेगळी भूमिका घेतली तर त्याचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसू नये यासाठी राम सातपुते यांच्यासह अन्य उमेदवारांची चाचणी करण्यात आली. माढ्याचा तिढा मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सोडविण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. त्यामुळे आमदार राम सातपुते यांचे नाव सोलापूर साठी निश्चित झाल्याची माहिती आहे.
आमदार राम सातपुते हे बीड जिल्ह्यातील डोईठाण येथील मूळ रहिवासी आहेत. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघातून ते विजयी झाल्यानंतर मतदार संघातील बहुतांशी प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. एक अभ्यासू आमदार अशी त्यांची ओळख आहे. सध्या ते माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत.