साधी राहणी-उच्च विचारसरणी अंगीकारणारे सामान्यांच्या बैठकीतील विलोभनीय व्यक्तिमत्व - मा.श्री.सोमनाथ जी विष्णुपंत आवताडे

साधी राहणी-उच्च विचारसरणी अंगीकारणारे सामान्यांच्या बैठकीतील विलोभनीय व्यक्तिमत्व - मा.श्री.सोमनाथ जी विष्णुपंत आवताडे 

मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये युवा पिढीच्या संघटनात्मक आणि सृजनशील कार्य विचारांची बैठक समृद्ध करून आणि आपल्या व्यापक व दूरदृष्टी कार्यसाधनेतून कृषी उत्त्पन्न बाजार समिती, मंगळवेढा या सहकारी पणन संस्थेस यशस्वी लौकिक प्राप्त करून देणारे नेतृत्व म्हणून कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा.श्री.सोमनाथ जी आवताडे मालक यांचे नाव प्राधान्य क्रमाने अधोरेखित केले जाते. आपले पिता तथा दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री.विष्णुपंत बापू आवताडे यांच्याकडून राजकारण, समाजकारण आणि सांप्रदायिक मूल्यांचा वसा आणि वारसा अंगीकृत करणारे सभापती मा.श्री.सोम मालक हे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील एक शांत, संयमी व मितभाषी युवा व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा प्रारंभ करणाऱ्या मा.श्री.मालक यांनी बाजार समिती या सहकारी पणन संस्थेला शेतकरी, व्यापारी आणि हमालांचे मंदिर म्हणून वेगळाच आयाम मिळवून दिला आहे. आपल्या सर्वसमावेशक कार्यपद्धती कारकिर्दीमध्ये त्यांनी शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांना केंद्रबिंदू मानून बाजार समितीचा अनोखा आदर्शवत कायापालट केला आहे.

मा.श्री.सभापती महोदय यांच्या धडाकेबाज व्यापक कामगिरीची दखल घेऊन नवमहाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह संस्थेने त्यांना बेस्ट सभापती राज्यस्तरीय या पुरस्काराने गौरवून त्यांच्या कार्याचा खूप मोठा अनोखा सन्मान केला आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात सहकार आणि कृषी क्षेत्रांचा अधिकतम प्रमाणात विकास साधायचा असेल तर राजकीय कार्यक्षेत्रातही तितक्याच जोमाने वावर ठेवणे गरजेचे आहे. काळाची ही गरज ओळखून माजी सभापती मा. श्री.सोम मालक यांनी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या विविध राजकीय घडामोडीमध्ये आपले कर्तबगार संघटन कौशल्य सिद्ध केले आहे. समाजकारण, राजकारण आणि सहकार या लोकसेवेच्या विधायक पटलावर मा.श्री.सोम मालक यांची कोणत्याही कार्याप्रती असणारी धोरणात्मक वृत्ती आणि बोलकी कृती ही जमेची बाजू समजली जाते. विविध कामांच्या निमित्त येणाऱ्याचे स्मितहास्याने स्वागत करून आपुलकीने आणि जबाबदारीने त्यांचे काम मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच उपलब्ध आणि तत्पर असतात.

सुखवस्तू घराणेशाहीत जन्मास येण्याचे भाग्य लाभलेल्या मा.सभापती महोदय यांनी संस्कार आणि संस्कृती या शिकवणीशी कधीही तडजोड केली नाही. ईश्वरकृपेने असणाऱ्या ऐश्वर्यसंपन्न श्रीमंतीचा झूल पांघरून कधीही परिस्थितीचा बडेजाव न मिरविता आपले पाय नेहमीच जमिनीवर ठेवणारे सभापती महोदय नेहमीच सर्वांना आपलेसे वाटतात.

सामाजिक आणि राजकीय कार्यक्षितिजावर नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा सुरेख संगम साधणारे प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून सभापती मा.श्री.सोम मालक हे जनतेच्या पसंतीस उतरत आहेत. कमी बोलणे आणि अधिकतम कृती करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची विशेष खासियत मानली जाते. मित्रांच्या गराड्यात रममाण होऊन जेष्ठ मंडळींना नेहमीच आदर्श आणि आदरयुक्त स्थानी ठेवणारे मा.सभापती महोदय हे सार्वजनिक समाजसंकल्पनेतील नातेसंबंधाचा आपुलकीप्रिय आयाम प्रस्थापित करत आहेत. कृतिशील विचारांची कावड आणि सर्वांगीण कार्याची आवड यांना आपलेसे करून पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या नेतृत्व कीर्तीची व्याख्या मजबूत करण्यासाठी सज्ज असलेल्या माजी सभापती मा.श्री.सोमनाथ जी आवताडे मालक यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांना मन:पूर्वक वाढदिवस अभिष्टचिंतन.

त्यांच्या या अनुकरणीय बहारदार व्यक्तिमत्वाचा आलेख उत्तरोत्तर असाच प्रगतीकडे झेपावत राहो. तसेच त्यांच्या मनातील राजकीय सोपान सिद्धी यशस्वीपणे पूर्णत्वास जावून आणि त्यांना उत्तम, सदृढ व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच परमात्मा श्री.पांडुरंग आणि श्री.संत दामाजी पंत चरणी प्रार्थना...!!

शब्दांकन - निवेदक श्री.संतोष आप्पा मिसाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.