माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नावही चर्चेत
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
खूप इच्छुक, प्रत्येकाच्या मनात वाढती धाकधूक, मीडियात रोज नवे नाव चर्चेत अशा पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षासह महायुतीचे उमेदवार म्हणून नाट्यमयरीत्या पुण्यातील उद्योजक पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून आले. पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुजोरा दिला आहे.
पद्मश्री डॉ.कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील आघाडीचे उद्योजक होत. डिक्की चे (धोरण निर्माता आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) ते संस्थापक आहेत. या दरम्यान, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावालाही पसंती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोलापूरसाठी रोज नव्या नावाची चर्चा सुरू होती. माजी खासदार अमर साबळे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते,सनदी अधिकारी भारत वाघमारे, माजी नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक नारायण बनसोडे, शिवसेना राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे, डॉक्टर टी.डी. कांबळे, माजी खासदार एडवोकेट शरद बनसोडे यांच्या नावाची चर्चा होती.यातील एका नावाची शिफारस करण्यासाठी चाचपणी करण्यात आली. त्यासाठी आमदार सुभाष देशमुख ,आमदार विजयकुमार देशमुख ,आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर ,मोहोळ ,पंढरपूर, मंगळवेढा ,शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपसह मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. या घडामोडी सुरू असतानाच आज अचानकपणे व नाट्यमयरीत्या पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांचे नाव समोर आले.
कोण आहेत ...डॉक्टर मिलिंद कांबळे
पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे हे सिव्हिल इंजिनियर, उद्योजक, धोरण निर्माता आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष आहेत. दलित समाजातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी पहिली भारतीय वाणिज्य संघटना त्यांनी स्थापन केली. त्यांना 2013 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ते मूळचे अहमदपूर तालुक्यातील चोबळी येथील आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध ग्रामीण व शहरी भागात शिक्षण घेतलेल्या डॉ.मिलिंद कांबळे यांचे स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण नांदेडच्या शासकीय पॉलिटेक्निक मध्ये झाले. सिव्हिल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर्स, फॉर्च्यून कंट्रक्शन कंपनीची स्थापना करून त्यांनी विविध कामे केली आहेत.