मंगळवेढा / प्रतिनिधी :-
हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि ज्या वर्षी अधिकमास आल्यास त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्ती भावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे.
संकट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात.एक असते ती मिठाची संकष्ट चतुर्थी व दुसरी पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा काल आमरण ,एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.
जी संकट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते. संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी नेहमी पुढे दिलेले "संकष्टी चतुर्थी महात्म्य" अवश्य वाचावे.
*उपवास कधीपासून सुरू करावा*
शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी पासून केली जाते. संकष्टी चतुर्थी सलग 21 संकष्टी धरून व्रताचे उद्यापन करावे. काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी धरतात तर बहुतेक जण आयुष्यभर देखील संकष्टी चतुर्थी धरतात.
*संकष्टी चतुर्थी करण्याची सोपी विधी*
या दिवशी सकाळी लवकर पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा.
दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. संध्याकाळी स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. तांब्या भोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हण ठेवून त्यात गणपतीची स्थापना करावी. आपण श्री गणपतीची सोने, चांदी ,तांबे वगैरे धातूची मूर्ती अगर तस्वीर ठेवू शकता. याची पूजा करणाऱ्यांनी लाल वस्त्र धारण करावे. पूजेत तांबड्या रंगाचे गंध -अष्टगंध -अक्षदा -फुल-वस्त्र वाहायचे असतात.
*महत्व*
या पवित्र दिवशी विधिपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी उपवास केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते. धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठी ही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हे व्रत करून चंद्र दर्शन केल्यानंतर गणेश पूजन करून ब्राह्मण भोजन द्यावे. यांनी अर्थ-धर्म- काम-मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात ,असे स्वयं गणपतीने म्हटले आहे.
*काय खावे काय नाही?*
बरेच लोक दिवसभर व्रत करतात आणि संध्याकाळी जेवण करतात.अशा परिस्थितीत उपवासानंतर कांदा, लसूण, बीट,गाजर आणि फणस खाण्यास मनाई आहे. उपवासाच्या दिवशी ते खाणे टाळा. या दिवशी कोणत्याही वस्तूत तुळशीचा वापर करू नका आणि तुळशीचे सेवन करू नका.
*संकष्ट चतुर्थी व्रत कथा*
एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू येते. गणपती वर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहे असे त्यांना कळतं. हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतो की आज पासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कोणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल.
यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात. तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्दशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल.
त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिले तर त्याने यापासून मुक्ती साठी काय करावे? त्यावर गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचा व्रत धरावा. त्यामुळे त्याची आळातून मुक्तता होईल.
पुराण काळातील कथांमध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर संम्यतक मनी चोरल्याचा आळ आला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले तेव्हा मुक्ती मिळाली.
सचिन जालिंदर हेंबाडे
ढवळस, ता. मंगळवेढा
मो. नं. 8668236467