मंगळवेढा (प्रतिनिधी):-
डाळिंब उत्पादन म्हणून ओळख असलेल्या सांगोला व चडचण व्यापाराच्या दृष्टींकोनातून महत्वपूर्ण असलेल्या या दोन शहरांना सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील विविध गावे - खेड्यामार्गे जाणारी एस.टी. बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी,अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी सांगोला आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील अनेक नागरिक,व्यापारी व छोटे-मोठे व्यावसायिक आपल्या कामानिमित्त, व्यवसायानिमित्त सतत चडचण येथे आपला राबता ठेवतात. त्यामुळे या लोकांची प्रवास वाहतूक सुलभता लक्षात घेऊन ही एस.टी.बस सेवा सुरू होणे खूप गरजेचे आहे.
ही बस सेवा मार्ग क्रमांक १ व मार्ग क्रमांक २ अशा पद्धतीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आ.समाधान आवताडे यांना प्रत्यक्ष भेटून केली असता मार्ग क्रमांक १मध्ये ही बस चडचण ते सांगोला म्हणजेच चडचण, सिद्धनकेरी,रेड्डे,भोसे,वाणी चिंचाळे, घेरडी, जवळा, सांगोला या मार्गे तर मार्ग क्रमांक २ मध्ये सांगोला ते चडचण म्हणजेच सांगोला,वाढेगाव, मेडशिंगी,आलेगाव, शिरसी,गोणेवाडी,नंदेश्वर, सिद्धनकेरी, रेड्डे, चडचण मार्गे प्रवास वाहतूक सेवा सुरु करावी, अशी मागणी आ.आवताडे यांनी सांगोला आगार व्यवस्थापकाकडे केली आहे.
पुढारी वृत्तसेवा