मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा पोलीस ठाण्यात डी. वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील व्यापाऱ्यांची एक सी.सी.टी.व्ही समाजासाठी या अंतर्गत बैठक नुकतीच पार पडली.
मंगळवेढा शहरात चौकात कुठेही
सी.सी.टी.व्ही.कॅमेरे नसल्यामुळे गुन्हेगार शोधणे फार कठीण होत आहे. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांची बैठक बोलावून त्यामध्ये एक सी.सी.टी.व्ही.समाजासाठी हा मुद्दा मांडून कॅमेरे बसविण्यासाठी त्यांना प्रेरीत केले. सध्या व्यापारी वर्गाच्या दुकानात कॅमेरे आहेत. हे कॅमेरे रस्त्यावरील दृश्य कैद करीत नसल्यामुळे व्यापाऱ्यांना आपले कॅमेरे बाहेरच्या बाजूला बसवून सहकार्य करण्याच्या सुचना यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिइडे यांनी दिल्या.
याला व्यापाऱ्यांनी शंभर टक्के सहमती दर्शविण्यात आल्याचे सांगण्यात आले.यावेळी व्यापाऱ्यांनी खाजगी व्यक्ती सी.सी.टी.व्ही. फुटेज मागतात असा मुद्दा मांडल्यावर पोलीस प्रशासनाने त्यांना मागण्याचा अधिकार नाही. केवळ स्थानिक पोलीस प्रशासन एखाद्या गून्ह्याचा उलघडा करण्यासाठी ते देवू शकतात असे यावेळी सांगण्यात आले. एखाद्या व्यक्तीने फुटेज मागण्यासाठी दमदाटी केल्यास कारवाई करण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. त्याच बरोबर सण उत्सव प्रसंगी चोखामेळा चौकात बॅरीगेट लावून वाहनांची होणारी कोंडी थांबवावी अशी मागणी करण्यात आली. शिवप्रेमी चौकातील समोरच्या बाजूस मोठी भाजीमंडई असून सोमवारी छोटे व्यापारी चक्क रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसतात.
बाजारकरु आपल्या मोटर सायकली रस्त्यावर लावतात परिणामी येथे दिवसभर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नगर परिषदेने बाजारकरुंना आतल्या बाजूस मंडईत बसण्याच्या सक्त सूचना कराव्यात असाही मुद्दा मांडण्यात आला. या बैठकीला गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार दिगंबर गेजगे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, जयदीप रत्नपारखी, अमोल रत्नपारखी, अरुण किल्लेदार, आनंद खटावकर, किसन सावंजी यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.