मंगळवेढा/प्रतिनिधी :-
आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत याची जाणीव ठेवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.वसंत हंकारे यांनी मांडले.
ते मंगळवेढा येथे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने सोमवारी सकाळी नऊ वाजत इंग्लिश स्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या बाप समजून घेताना या विषयावर ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ॲड.सुजित कदम,उपाध्यक्ष डॉ सुभाष कदम,अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेटर डॉ.मीनाक्षी कदम,सचिव प्रियदर्शनी महाडिक,सहसचिव श्रीधर भोसले,संचालिका प्रा. तेजस्विनी कदम,अजिता भोसले,यतिराज वाकळे,रामचंद्र नेहरवे,ॲड.शिवाजी पाटील,प्राचार्य राजेंद्र गायकवाड,रवींद्र काशिद, प्रा.राहुल जाधव यांच्यासह राजेंद्र जाधव, अविनाश शिंदे, राजेंद्र चेळेकर, लक्ष्मण माने, कल्याण भोसले, युवराज मोरे, मारुती लवटे, माजी सैनिक संघटनेचे मलय्या स्वामी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बोलताना हंकारे यांनी कदम गुरूजीनी संस्था स्थापन करताना चांगल्या रणरागिणी निर्माण करण्यासाठी शाळेची स्थापन केली आहे. सावित्रीबाई फुले ,फातिमा यांनी आपल्या शिक्षणासाठी यातना भोगल्या याची जाणीव मुलीनी ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे युगपुरुष माता जिजाऊ मुळेच घडले म्हणून मुलीचं आयुष्य कुणीतरी संपवावे एवढे सोपे नाही. मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे ती म्हणजे आपली आई. आपल्या आई-बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे.आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना केले. तुम्ही आयपीएलचे रना मोजता, त्यांचा हिशेब ठेवतात, ज्या आई-बापाने आपल्याला जन्म दिला, मोठे केले, अंगा-खांद्यावर खेळवले, त्या बापाने आपल्यासाठी किती रन काढले आहे. याचा हिशेब तुम्ही कधी करणार? कारण आज हिशेब करण्याची वेळ आलेली आहे. तो तुम्हाला करावाच लागेल असे विद्यार्थ्यांना त्यांनी बजावून सांगितले. भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले मात्र ते पाहण्यासाठी जर आई-बाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैशांचा उपयोग होणार काय? असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला.आई-बाबांनी लहानपणी आपल्यासाठी काय केले आहे हे तुम्हाला चांगले माहिती आहे.लहानपणी आपल्याला आई-बाप कळत होते, आता मात्र आम्ही कॉलेजला जायला लागलो, आम्हाला बंधनात तुम्ही ठेवायला लागले, असा तुमचा समज झाला आहे. त्यामुळे मम्मी-पप्पा तुम्ही आम्हाला आता आवडत नाही, आय हेट यू, मम्मी-पप्पा अशी वाक्य मुलांच्या तोंडून येऊ लागली आहे. पण असे व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आले आहे.परत एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले आई-बाप यातून नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद डॉ.हंकारे यांनी व्यक्त केला.जो निराधार, त्याला आई-बापाची किंमत विचारा... आई-बापाची किंमत त्याला विचारा ज्याचे लहानपणीच आई-बाप त्याला सोडून गेले आहेत. ते तुम्हाला पूर्ण जाणीव करून देतील असे सांगितले.
प्रास्ताविकात संस्थेच्या अकॅडमिक प्रमुख डॉ. मीनाताई कदम यांनी दलित मित्र कदम गुरुजी यांनी शिक्षण संस्था प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केली. आज हा वटवृक्ष झाला आहे.वसंत हंकारे यांचे विचार हे अंतर्मुख करणारे असतात आज मुलांना या प्रबोधनाची गरज असल्याचे सांगितले.अविनाश शिंदे यांनीही या वेळी बोलताना शाळेची कृतज्ञता व्यक्त केली. तर विद्यार्थिनी वर्षा दिवसे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी स्व.दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.वसंत हंकारे यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले तर आभार लता ओमने यांनी मानले.कार्यकमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.