चालक, मालकासह कामगारावर गुन्हा दाखल
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मुढवी येथे बेकायदा वाळू वाहतुक करणारे वाहन महसूल पथकाने पकडून ५ लाख ६ हजार ५०० रुपये किमतीच्या वाहनासह मुद्दमाल जप्त करून अज्ञात चालक,मालक व इतर चार इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी धनंजय इंगोले हे मंगळवेढ्याचे मंडल अधिकारी असून दि.२२ रोजी मध्यरात्री १२.१५ वा. मुढवी येथील एका वस्तीजवळ पांढऱ्या रंगाच्या बिगर नंबरचा टाटा इन्स्ट्रा कंपनीच्या वाहनात अज्ञात चालक,मालक व इतर अनोळखी दोन इसम ५ हजार ५०० रुपये किमतीची पाऊण ब्रास वाळू घेवून जात असताना महसूल पथकाला आढळून आले.
सदर पथकाने वाहन ताब्यात घेवून तहसील कार्यालयाकडे कारवाईसाठी आणत असताना चालकाने वाहनातील वाळू कोठेतरी टाकून वाहन रोडवर थांबवून चालक व त्याबरोबर असलेले इतर साथीदार हे पळून गेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.मंडल अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून चालक ,मालक व इतर चार मजूरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ५ लाखाचे वाहन जप्त केले आहे.