मंगळवेढा (प्रतिनिधी) :-
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ज्या मार्गावरुन पालख्या जातात त्या सोलापूर-मंगळवेढा, मंगळवेढा-पंढरपूर या पालखी मार्गाचे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी पाहणी करुन मार्गावर जेथे वृक्ष नाहीत तेथे वृक्षारोपण केले. तसेच ज्या ठिकाणी जागा रिकाम्या आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या पोलीस प्रशासनास सूचना केल्या आहेत.
दि.६ जुलै रोजी पंढरपूर येथील आषाढी वारी भरत असल्याने या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर लांबून येणाऱ्या वारकऱ्यांना विश्रांतीसाठी महामार्गावर वृक्षाचा आसरा मिळावा या उदात्त हेतूने सोलापूरचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर-मंगळवेढा, मंगळवेढा-पंढरपूर या पालखी मार्गाची शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली. वृक्ष लावलेल्या ठिकाणची काही वृक्षे जळून गेल्याने ती जागा मोकळीच असल्याचे चित्र असून या ठिकाणी खड्डे खोदून त्या जागी वृक्ष लावण्याच्या सुचना केल्या.
महामार्गालगत शेतकऱ्यांची शेती असल्याने शेतकऱ्यांनी महामार्गालगत फळझाडे लावावीत असेही त्यांनी आपले मत यावेळी व्यक्त केले. मंगळवेढा- पंढरपूर पालखी मार्गावरुन श्री गजानन महाराज पालखी व्यतिरिक्त कर्नाटक राज्यातील असंख्य दिंड्या येथून पंढरीला जातात त्यामुळे या पालखी मार्गाला अधिक महत्व आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवेढयातील हॉटेल सुगरण जवळ मोकळ्या जागेत वृक्ष लावून शुभारंभ केला. तसेच वारी परिवाराने महामार्गालगत लावलेल्या वृक्षांची पाहणी केली.
यावेळी वारी परिवाराचे सतिश दत्तू, प्रा.विनायक कलुबर्मे त्याचबरोबर पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे,वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संभाजी यादव,गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे आदी उपस्थित होते.