मंगळवेढा/प्रतिनिधी :-
मृत्यू झाल्यानंतर नदीत अस्थिविसर्जन केले जाते परंतु एका कुटुंबाने नदीत अस्थिविसर्जन न करता स्मशान भूमीत खड्डा खोदून एक झाड ठेवून त्यावर वृक्षारोपण केले आहे. वडिलाच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प या कुटुंबाने केला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब यादव यांचे वडील ह.भ.प.तुकाराम तुळशीराम यादव वय ८३ यांचे नुकतेच वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने निधन झाले.निधन झाले की रितीरिवाजानुसार सर्वच विधी पार पाडावे लागत असतात. परंतू मारापूर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, मारापूर विकास सेवा सोसायटी व जय हनुमान भजनी मंडळ, यांच्या वतीने या प्रथेला तिलांजली देत पर्यावरण पूरक पायंडा पाडला आहे. बाळासाहेब यादव यांच्या वडिलांच्या अस्थी राखेसह पाण्यात विसर्जन न करता स्मशान भूमीतच खड्डा खोदून अस्थी त्यात बुजून त्या जागेवर एक झाड लागवड करून स्व.तुकाराम यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. वडिलाच्या नावाने लावलेल्या या झाडाच्या रुपाने आठवणींना उजाळा मिळणार आहे.
यावेळी वारी परिवार,मंगळवेढा,कृषी क्रांती,मंगळवेढा, सजग नागरिक संघ मंगळवेढा व मारापूर ग्रामपंचायत सरपंच,सदस्य, मारापुर विकास सेवा सोसायटी या सर्व संस्थेचे सदस्य,संचालक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
ग्रामीण भाग असो कि शहरी भाग कुणाचेही निधन झाले म्हणजे जुन्या रूढी परंपरेनुसार सर्व कार्यक्रम करावे लागतात त्यातीलच अस्थी विसर्जन निधनाच्या तिसऱ्या दिवशी अस्थी विसर्जन कार्यक्रम असतो. या दिवशी अस्थी एकत्र करून त्या नदीत किंवा संगमच्या ठिकाणी विसर्जित करण्याची प्रथा आहे. परंतु यामुळे पाणीही दूरषित होते व पर्यावणाचा न्हास होतो. अनेक ठिकाणी कमी पाण्यातही अस्थी विसर्जन करावे लागते. कमी पाणी असल्यामुळे ते दूषित असते त्याच पाण्यात त्या अस्थी टाकून मोकळे होतात. त्या आत्म्याचा शेवट चांगल्या पाण्यात होत नाही. या सर्व बाबींचा विचार करता अस्थी विसर्जन न करता त्या मृत व्यक्तीची कायमस्वरूपी आठवण म्हणून अस्थी पुरून त्या जागेवर झाड लावले, या नवीन उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
निसर्गपाठ बोलून वृक्षारोपण
"रूप पाहता लोचनी, पर्यावरण ठेवू मनी त्वा विठ्ठल बरवा, झाडे लावा झाडे जगवा बहुत सुकृताची जोडी, धरा सेंद्रिय खताची आवडी सर्व सुखाचे आगर, बनव् आमराई सुंदर।"
हा निसर्गपाठ या प्रसंगी म्हणण्यात आला आणि वृक्षारोपण करण्यात आले.
स्मृती जपण्यासाठी उपक्रम
नदीत अस्थि विसर्जन केल्यानंतर प्रदूषण होते. पण या उपक्रमाने एक चांगला आदर्श लोकांसमोर ठेवण्यात आला आहे. एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करणे मनाला दिलासा देणारे आहे. कारण रोप जसे वाढेल तसे त्या सळसळणाऱ्या पानांतून ती व्यक्तीच आपल्याशी संवाद साधतेय अशी भावना मनी येईल. हा आनंद अविस्मरणीय ठरेल, पिढ्यान् पिढ्या हा वृक्ष त्या व्यक्तीची आठवण म्हणून बहरत जाईल. ही खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे सरपंच विनायक यादव यांनी सांगितले.