मंगळवेढा /प्रतिनिधी :-
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या 7/12 उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी करून त्यावर त्यांच्या वारसांची नावे लागण्यासाठी आजपासून मंगळवेढा तालुक्यात जिवंत सातबारा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील 81 गावात आजपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. वारस नोंदणी प्रक्रियेत बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळा कोर्ट केसेस सुद्धा यात होतात आणि शेतकऱ्यांना नाहक मनःस्ताप होतो. या मोहिमेच्या निमित्ताने हा प्रकार थांबणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जिवंत सातबारा या मोहीम अंतर्गत दिनांक 1 ते 5 एप्रिल पर्यंत चावडी निहाय मयत खातेदारांची यादी तयार करून त्या यादीचे चावडी वाचन केले जाईल, त्यानंतर दिनांक 6 ते 20 एप्रिल पर्यंत वारसांना आवश्यक कागदपत्रे घेऊन अर्ज करावा लागेल. दिनांक 21 एप्रिल ते 10 मे पर्यंत ई फेरफार प्रणाली अंतर्गत सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद घेतली जाईल.
या मोहिमेत अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला, रहिवासी पुरावा, वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र प्रतिज्ञापत्र, पोलीस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची माहिती देणे आवश्यक राहील.
सदरची मोहीम मंगळवेढा तालुक्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी बी. आर. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.तरी या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.