कै. महादेव बाबुराव आवताडे यांच्या १९ व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त किर्तनसेवा संपन्न
मंगळवेढा/ प्रतिनिधी -
मोठ्या कर्म नशिबाने प्राप्त झालेल्या मानवी जीवनाचे सार्थक होण्यासाठी आणि सामाजिक प्रतिष्ठित स्वतःला सामावून घेण्यासाठी स्वतःचे स्वतःला कौतुक वाटेल असे जीवन आपण जगले पाहिजे आणि त्यासाठी संत विचारांची मौलिक तत्वे विकसित आणि आत्मसात केली पाहिजेत अशी भावना नामांकित युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांनी श्रध्येय कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १९व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सेवेसाठी आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथील प्रांगणात
मांडली आहे.
सदरवेळी प्रारंभी आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व इतर उपस्थित मंडळींनी स्व.महादेव आवताडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी वक्तृत्वातून संत विचारांच्या अद्वितीय स्फूर्तीकुंदीत प्रगल्भतेच्या प्रेरणादायी गाथेची उत्तुंग मांडणी चैतन्य महाराजांनी केली.
स्व.आण्णांची व्यक्तीभूमिका ही केवळ प्रेरणा नव्हे, तर यशस्वी भविष्याचा दीपस्तंभ आहे. आवताडे परिवाराच्या उभारणीसाठी आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी त्यांनी केलेला त्याग, कुशल मानवता आणि लोककल्याणकारी समाजशीलता यांचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा वैचारिक कीर्तन व व्याख्यान उपक्रम निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे, जिल्ह्याचे मा.आमदार प्रशांत परिचारक नामवंत उद्योगपती उद्योगरत्न संजय आवताडे, तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे, उद्योजक स्वप्निल आवताडे, कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष शैलेश आवताडे यांचेसह विविध प्रशासकीय कार्यक्षेत्रातील अधिकारी मान्यवर मंडळी, पदाधिकारी आणि इतर नागरिक महिला उपस्थित होते.