काटेरी झुडपांमुळे रस्ता बनला अपघातास कारणीभूत
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथील रस्त्याचे पूर्णता तीन तेरा वाजले आहेत. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने सिंगल वाहन चालविणे कठीण झाले आहे. या रस्त्याकडे जबाबदार अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. काटेरी झुडपे तात्काळ काढून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी सामजिक कार्यकर्ते रवींद्र हेंबाडे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मल्लेवाडी ते धर्मगावं या पाच किलोमीटर रस्त्याचे काम टप्या-टप्प्याने झाले असल्याने हा रस्ता दुर्लक्षित झाला आहे. या रस्त्यावर मल्लेवाडी पासून ढवळस दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्हीही बाजूला काटेरी झूडपांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता पूर्णता झाकाळला गेला आहे. दिवसेंदिवस हा रस्ता काटेरी झूडपांच्या विळख्यात आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
काटेरी झूडपांच्या वाढलेल्या अतिक्रमणाने वाहन चालविणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी काटेरी झुडपांच्या फांद्या आल्याने पुढे रस्ता आहे की नाही, हेच समजत नाही. वर्षाभरात याच रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली असल्याने जबाबदार अधिकारी या रस्त्याकडे पाहायला तयार नाही.
या रस्त्यावरून दिवसातून 2 ते 4 वेळा धावणारी एस टी बस वाहन जाताना समोरून येणाऱ्या वाहनाला काटेरी झुडपा मध्ये जावे लागते व एस टी बस ला जाण्यासाठी वाट करून द्यावी लागते. तसेच काटेरी झुडपांमुळे समोरून आलेले भरधाव वाहन वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.या रस्त्यावर शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर यांच्यामुळे भरपूर रहदारी असल्यामुळे शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांना रस्त्याने चालत जाताना येताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
भविष्यात या ठिकाणी काटेरी झुडपांमुळे भीषण अपघात होऊ शकतो. या वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहन रस्त्याच्या कडेला उभी करणे जिकिरीचे ठरू लागले आहे. अनेक वेळा या झुडपांचा मार प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
================================
मल्लेवाडी ते ढवळस दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला उगवलेल्या काटेरी झुडपांमुळे धोकादायक वळण लक्षात येत नाही.त्यामुळे येथे भीषण अपघात होऊ शकतो. संबंधित विभागाने त्वरित ही काटेरी झाडे-झुडपे काढून टाकावीत.
-- रवींद्र हेंबाडे , सामाजिक कार्यकर्ते, ढवळस.