ढवळस गावातील 2011 नंतर जवळ- जवळ 13 वर्षानंतर वयाच्या 22 व्या वर्षी पोलीस होण्याचा विक्रम केल्याबद्दल तरुण वर्गात आनंदाचे वातावरण
मंगळवेढा (सचिन हेंबाडे):-
मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावचे सुपुत्र ऋषिकेश दत्तात्रय आवताडे यांचे महाराष्ट्र पोलीस अंतर्गत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतून रायगड जिल्हा पोलीस पदी नुकतीच निवड झाली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये परिस्थिती समोरे हार न मानता अवघ्या कमी वयात 22 व्या वर्षात त्याने हे संपादन करून ढवळस गावातील 2011 नंतर जवळ- जवळ 13 वर्षानंतर पोलीस होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सदर पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झाल्यापासून त्याने अविरतपणे परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करून कमी वयात आपल्या उराशी असणारे खाकी वर्दीचे स्वप्न अखेर प्रयत्न करून प्रत्यक्षात उतरवले आहे.कोणतीही शैक्षणिक अथवा नोकरी विषयक पार्श्वभुमी नसताना केवळ आपल्या स्वप्नाशी एकनिष्ठ राहून त्याने पदवी शिक्षण घेत पूर्ण करत हे यश प्राप्त केले आहे.
नूतन पोलीस ऋषिकेश आवताडे याचे शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढवळस,आठवी ते बारावी पर्यंत न्यु इंग्लिश स्कूल, मंगळवेढा व पुढे पदवीचे टी.वाय.बी.ए. शिक्षण श्री संत दामाजी कॉलेज मध्ये चालू आहे.
पोलीस म्हणून खाकी वर्दी माझ्या अंगावर येणे माझ्यासाठी जीवनातील सर्वोत्तम अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. परंतु एवढ्याच यशावर न थांबता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मोठ्या पदाला गवसणी घालून माझ्या परिवाराची व माझ्या गावाची मान सन्मानाने उंचावेल असा विश्वास नूतन पोलीस ऋषिकेश आवताडे यांनी व्यक्त केला आहे.
या यशाबद्दल ढवळस गावातील नागरिक व तरुण वर्गातून आनंदाने शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.