अज्ञात चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
ढवळस येथील माण नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून त्याची वाहतूक करताना पोलिसांनी टेम्पो पकडून 3 लाख 3 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी अज्ञात चालक,मालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी पोलीस हवालदार श्रीमंत पवार हे अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने दि.15 मे रोजी रात्री 11 वाजता मंगळवेढा पोलीस हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, ढवळस गावात माण नदीच्या पात्रात अवैध रित्या वाळू उपसा होत असलेबाबत माहिती मिळताच सदर ठिकाणी पोलीस पथक गेल्यावर गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील चौकात आल्यावर नदी पात्रातून अशोक लेलँड कंपनीचा दोस्त मॉडेलचा नंबर नसलेले वाहन दोन हेडलाईट लावून येत असताना दिसले.पोलिसांनी इशारा करताच अज्ञात चालकाने वाहन उभे करून पलायन केले.
पोलिसांनी हौद्यात तपासणी केली असता 3 हजार रुपये किंमतीची अर्धा ब्रास वाळू व 3 लाखाचा टेम्पो असा एकूण 3 लाख 3 हजाराचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात चालक व वाहन मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.