मंगळवेढा /प्रतिनिधी:-
मंगळवेढा तालुक्यात दिनांक 10, 11 व 12 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळ वारा यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात आले आहेत.
दिनांक 10 ते 12 एप्रिल पर्यंत झालेल्या पावसाने तालुक्यातील जवळपास 18 गावांमध्ये शेती पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये वादळी वाऱ्याने एकूण 25 घरांचे पत्रे उडून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. तसेच दोन ठिकाणी झाड घरावर पडून भिंतींचे नुकसान झाले आहे. तसेच वीज पडून कर्जाळ येथे एक व बोराळे येथे एक जर्सी गाय, कचरेवाडी येथे एक म्हैस असे एकूण तीन मोठी जनावरे मृत झाली आहेत.
त्याचप्रमाणे तळसंगी, मरवडे, डीकसळ येथे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. रेवेवाडी व आंधळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे शेळ्या व पिले मृत झाली आहेत. तालुक्यातील डीकसळ, रेवेवाडी, भाळवणी, मरवडे, जालिहाळ, बावची, खडकी, कर्जाळ, कात्राळ, तळसंगी, कचरेवाडी, आंधळगाव, कागष्ट, लमाणतांडा, हाजापूर, बोराळे आदी गावांमध्ये नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे नुकसान झाले आहे.
उपरोक्त नुकसान ग्रस्त ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी भेटी दिल्या असून संबंधित नुकसानीचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे.
सदरचा अहवाल पुढील कार्यवाहीस्तव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात येणार असून अजूनही ज्या शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामा करायचा राहिला असेल त्यांनी आपल्या तलाठी, सर्कल यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.