सोलापूरची लेक तुमचंही सोलापुरात स्वागत करते..! असे म्हणत राम सातपुते यांच्या उमेदवारीवरून प्रणिती शिंदेंनी लगावला टोला

सोलापूरची लेक तुमचंही सोलापुरात स्वागत करते..! असे म्हणत राम सातपुते यांच्या उमेदवारीवरून प्रणिती शिंदेंनी लगावला टोला

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे. 

राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे.

तसेच पुढील ४० दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी फटकेबाजीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सातपुतेंवर केली आहे.

तसेच ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवू या आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आव्हान दिले आहे. प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे आता खऱ्या अर्थाने सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे. दरम्यान आगामी काळात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये ट्विटर वार रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.