मोची समाजाची मागणी होणार पूर्ण
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मोची समाजातील तब्बल २५० युवकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून निष्कारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत या युवकांना न्याय मिळावा, अशी मागणी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी करताच लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शनिवारी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मोची समाजाच्या समस्या मांडल्या. मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या मोची समाजातील सुमारे २५० युवकांवर ३५३ कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी केली असता 'पोलीस आयुक्त आमचे ऐकत नाहीत' असे उडवाउडवीचे उत्तर त्यांनी दिले होते. मात्र आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असे सांगताच महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. तसेच मोची समाजातील २५० युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती केली. "मोची समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. काळजी करू नका", असे आश्वासन यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच मोची समाजातील नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत आमदार राम सातपुते यांचे आभार व्यक्त केले.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या, महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा या लोकसभा निवडणुकीत विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे हे आपल्या मुला-मुलींना निवडून आणण्यासाठी धडपडत आहेत. महायुतीने मात्र आमदार राम सातपुते यांच्यासारख्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी देऊन सर्वसामान्यांना न्याय दिला आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापूर शहर जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सोलापूरकरांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा सोलापूरसाठी आणण्याकरिता महायुती कटिबद्ध आहे.
युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, युवा सेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले, दक्षिण तालुका प्रमुख संदिप राठोड, निहाल शिवसिंगवाले,भाजपाचे भीमराव आसादे, हिंदूराष्ट्र सेनेचे शहर अध्यक्ष रवी गोणे, श्री स्वामी समर्थ सोसायटीचे अध्यक्ष विनोद बागल, सचिव रविंद्र पाटील, युवा सेनेचे उपशहर प्रमुख स्वप्निल कांबळे, दीपक पाटील, श्रीकांत गट्टू, सागर राजपूत, भीमा वाघमारे, मंगेश जंगडेकर, राहुल यमकोटे आदी उपस्थित होते.