मंगळवेढा / सचिन हेंबाडे :-
अनेकदा आपल्या जीवनात येणारी वाईट परिस्थिती सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जाणारी असते, फक्त आपण तिच्याकडे त्या दृष्टीने पाहिले पाहिजे, पुढे पडणारे पाऊलच विकास घडवते असे नाही तर दोन पावले मागे पडली तरी जिद्दीने आपण पुढे जाऊ शकतो, असा विश्वास मुंबई आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका व युवा आयडॉल अनघा मोडक यांनी व्यक्त केला.
सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:00 वाजता सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ आयोजित पुष्प पहिले कार्यक्रमात "जगण्याचे गाणे होताना !" या प्रेरणादायी विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर रामचंद्र वाकडे, मारुती वाकडे ,विष्णुपंत जगताप ,भीमराव मोरे ,बी.बी. जाधव, सोमनाथ माळी, अरुण किल्लेदार ,सोमनाथ बुरजे,भारत ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनघा मोडक म्हणाल्या, वयाच्या 24 व्या वर्षी वडिलांचे निधन आणि 25 वर्षी एका आजारात माझी अचानक नजर गेली. मात्र खऱ्या प्रयोगाला तेव्हाच सुरुवात झाली. तेव्हापासून मी जीवनाकडे डोळसपणे पाहू लागले. आयुष्यात येणारी प्रत्येक वाईट परिस्थिती आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठीच आलेली असते. केवळ तिच्याकडे आपण दूरदृष्टीने पाहिले पाहिजे. आयुष्याच्या वाटेवरील काटे वेचत पुढे गेले पाहिजे. तिसऱ्या अंकानंतर तुमच्या कल्पनेचे वास्तवात रूपांतर होणे,यालाच आयुष्याचे नाटक म्हटले जाते. बऱ्याच वेळा दुःखाच्या एका क्षणामुळे आपण आयुष्यातील सगळी सुखी विसरून जात जगण्याचा आनंद गमावतो. त्यामुळे वाईट परिस्थितीचा विचार न करता त्यातून सुद्धा आपल्याला काय चांगले शिकता येते, याचा विचार करावा आणि त्या दृष्टीकोणातून पुढचा प्रवास सुरू ठेवा.
त्यापुढे म्हणाल्या, आपल्याला जी गोष्ट मिळत नाही, त्याच गोष्टीचा आपण नेहमी विचार करत बसतो. देवाला दूषण देतो. मात्र त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खूप काही चांगलं या गोष्टी मिळालेल्या असतात. त्याबद्दल आपण कधीच देवाचे आभार मानत नाही. एका कार्यक्रमात श्रोत्यांनी मला प्रश्न केला भगवंताने तुमचे डोळे हिरावून घेतले, मग त्याच्या विषयी तुम्ही एवढे गोड का बोलता ? त्यावेळी मी त्या व्यक्तीला उत्तर दिले. हे जग पाहण्यासाठी असलेले डोळे भगवंताने जरूर हिरावून घेतले असतील ,पण त्याच वेळी त्यानेच मला जीवनाकडे पाहण्याची दूरदृष्टी सुद्धा दिली आहे.
त्याने नंतरच्या काळात माझ्यावर खूप कृपादृष्टी ठेवली, म्हणून आज मी तुमच्यासमोर आहे. त्यामुळेच आपण नसलेल्या गोष्टीची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा फायदा करून जीवनात यशस्वी झाले पाहिजे, त्यासाठी दूरदृष्टी असायला हवी मानवी जीवनात प्रज्ञावान होण्यासाठी मेहनत घ्यायला हवी. पण यश येत नाही म्हणून खचून जाऊ नका. तांदूळ निवडताना खडे वेचले जातात, तसे वाटेवरचे काटे वेचता येईल का ? याचा विचार करा. नफरतीच्या बाजारात हसणे विकायला शिका. अडचणीमधून प्रकाशमान व्हायला शिका, असा संदेश मोडक यांनी श्रोत्यांना दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विनायक कलुबर्मे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी मानले.