मंगळवेढा शहरातून काढली ५१ कलशांची सवाद्य मिरवणूक; श्री रिद्धी-सिद्धी महागणपतीसह ५१ संतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना,आज दुसरा दिवस स्थापित देवतांचे पूजन, भजन, कीर्तन

मंगळवेढा शहरातून काढली ५१ कलशांची सवाद्य मिरवणूक; श्री रिद्धी-सिद्धी महागणपतीसह ५१ संतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

 आज दुसरा दिवस स्थापित देवतांचे पूजन, भजन, कीर्तन

मंगळवेढा / सचिन हेंबाडे :-

श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिरापासून सुवासिनींनी डोक्यावर ५१ कलश घेतले. मिरवणूक निघाली. समोर पुण्याच्या ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण, सनई-चौघड्याचे मंजूळ सूर, अन् विद्यार्थ्यांचा लेझीम संघ यामुळे शहर भक्तिचैतन्यात न्हाऊन निघाले होते.
श्रींच्या प्रतिकात्मक व देव देवतांच्या, साधू संतांच्या प्रतिमांची शहरातून मिरवणूक ‘काढण्यात आली. शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, नवरंग चौकात मिरवणुकीवर गुलाबाची पुष्पवृष्टी करण्यात आली.
श्री रिद्धी सिद्धी महागणपती मूर्ती, ५१ साधू-संतांच्या मूतींसह देवी-देवतांच्या मूतींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या वेळी कलशारोहण व ध्वजस्तंभारोहण सोहळा झाला.
तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून काल सोमवारी सकाळी ७ ते ९ आरंभ संभारदान, दशरुणान, प्रायश्चित्त होम, शांती होम, प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्यवचन, मातृत्व पूजन, नांदी श्राध्द, आचार्यवर्णी आणि उदकशांती झाले.
दुपारी १२ ते ३ भजन करण्यात आले. महिलांचे भजन झाले. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंडप पूजन, देवता स्थापना, अग्नी स्थापना, जलाधिवास, ग्रहयज्ञ, शय्याधिवास, धान्याधिवास सायंपूजा आदी कार्यक्रम झाले. गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांचा भक्ती संगीत रजनी हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
आज स्थापित देवतांचे पूजन, भजन, कीर्तन आज मंगळवारी दि.१३ फेब्रुवारी सकाळी ७ ते ९ स्थापित देवता पूजन, प्रधान होम, सर्व देवी देवतांचे प्रधान होम, दुपारी १२ ते ३ भजन – समस्त मंगळवेढा शहर व तालुका पुरुष भजनी मंडळाचे सादरीकरण, दुपारी ३ ते ६ प्रधान होम संत मूती स्थापना, सायंपूजा व आरती, सायंकाळी ७ ते ९.३०: बाल कीर्तनकार श्री चैतन्य महाराज राऊत यांचे कीर्तन होणार आहे.

सनई-चौघड्याबरोबर लेझीमही…

या मिरवणुकीचे ५१ कलशाची मिरवणूक काढली. ट्रॅक्टरमध्ये रिद्धी-सिद्धी महागणपतीची मूर्ती ठेवण्यात आली होती. न्यू इंग्लिश स्कूल, नूतन मराठी विद्यालय, जवाहरलाल शाळा या यांनी सहभाग नोंदवून वेगवेगळ्या सांस्कृतिक कला सादर केल्या. घोडे, लेझीम पथक, बैलगाडी, भजनी मंडळ, ढोल-ताशा, उंट, सनई-चौघडा, पारंपरिक वाद्य पथक सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.