तामदर्डी बंधारा बांधकाम करण्यासाठी त्वरित भरीव निधीची तरतूद करावी - आ समाधान आवताडे
मंगळवेढा/प्रतिनिधी -
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधकामासाठी ही अधिवेशन संपण्यापूर्वी निधीची तरतूद करुन या कामासाठी सुरुवात करावी अशी मागणी मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लक्षवेधी मांडत असताना आमदार आवताडे यांनी ही मागणी केली आहे. आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेऊन राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांनी लवकरात-लवकर मंजूर प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवून या बंधारा बांधकामासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून आवश्यक निधीची तरतूद हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उत्तरादखल दिले आहे.
सदर मागणी संदर्भात आपली भूमिका मांडत असताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, सद्य काळात भिमा नदीवर असणाऱ्या माचणूर ते कोल्हापूर पद्धतीचा वडापूर येथील बंधाऱ्या दरम्यान जवळपास २० किमी इतके अंतर असून त्यामुळे या अंतराच्या मध्यभागी असणारी माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, बोराळे मुंढेवाडी, आदी गावे सुरुवातीपासूनच पाणी व सिंचनाच्या सुविधा यापासून वंचित आहे. वास्तविक पाहता, या बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यास जवळपास ५५० हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच या बंधाऱ्याचा उपयोग केवळ मंगळा तालुक्यातील गावांनाच नव्हे तर मोहोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेतीक्षेत्र सुद्धा या पाण्यामुळे ओलिताखाली येणार आहे हा बंधारा सन २००१ पासून म्हणजेच गेल्या २२वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे होता, परंतु बंधारा बांधण्याच्या दिशेने या विभागाकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याने हा बंधारा केवळ कागदावरच राहिला होता.
यासंदर्भात येथील स्थानिक नागरिकांचा पाणी प्रश्न लक्षात घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी सदर बंधाऱ्याचे काम जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे वर्ग करावे अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती, आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेऊन मंत्री महोदय यांनी पाठीमागील काळामध्ये हा बंधारा जलसंधारण विभागाकडे वर्ग केला आहे. तेव्हा संबंधित बंधाऱ्याचे सर्वेक्षण झाले असून सर्वेक्षण होऊन चार महिने उलटून गेले तरी केवळ निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या या बंधाऱ्यासाठी निधी मिळावा यासाठी आ आवताडे यांनी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा करुन ही मागणी लावून धरली आहे. परंतु आता संबंधित खात्याचे मंत्री महोदय यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आ आवताडे यांच्या माध्यमातून सदर बंधाऱ्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.