विनारॉयल्टी वाळू आढळल्यास बांधकाम मालकास होणार दंड - तहसीलदार स्वप्निल रावडे

विनारॉयल्टी वाळू आढळल्यास बांधकाम मालकास होणार दंड - तहसीलदार स्वप्निल रावडे 


मंगळवेढा (प्रतिनिधी):-

           वाळूची चोरी रोखण्यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कंबर कसली असून यासाठी महसूल व पोलिसाचे १० जणांचे पथक नेमले आहे.आता विनारॉयल्टी वाळू आढळल्यास त्या बांधकाम मालकास ब्रासला तब्बल ४० हजार रुपये दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.तहसीलदार रावडे स्वतः बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावर जाऊन रॉयल्टीची तपासणी करीत आहेत. मंगळवेढा शहरात रविवारपासून कारवाईची मोहीम सुरू केली असून चोरीच्या वाळूने बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.सध्या सोलापूर जिल्ह्यात कुठेही वाळूचा लिलाव झाला नाही. तरीही तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे.

             वाळू लिलाव नसताना ठिकठिकाणी वाळूचे ढीग ही स्थिती वाळू चोरीकडे दिशानिर्देश करीत आहे. रात्रीच्या सुमारास वाळूचोरी होत असल्याने प्रशासनसुद्धा हतबल झाल्याचे चित्र आहे.शेजारच्या तालुक्यातील वाळूमाफियांनी काही महिन्यापासून अक्षरश : धुडगूस घातला आहे. यामध्ये नुकताच एका पोलिसाला जीव गमवावा लागला.

              अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी विनारॉयल्टी वाळू साठवणूक व खरेदी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आक्रमक पाऊल तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी उचलले आहे.

              सध्या वाळूअभावी बांधकाम थांबल्याने १० ते १२ हजार रुपये ब्रासने खरेदीदारांना पुन्हा त्या वाळूला प्रतिब्रास ४० हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याने अवैध वाळू वाहतूक, चोरी, विक्रीला आळा बसणार आहे. तर चोरीच्या वाळूने बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वाळूची पावती दाखवावी

             महसूल विभागाचे पथक नेमले आहे . प्रत्येक वाळूसाठ्याच्या ठिकाणी जाऊन रॉयल्टी पावतीची चौकशी केली जात आहे . बांधकामासाठी वापर केलेल्या , साठविलेल्या वाळूची पावती दाखवावी , अन्यथा शासन नियमानुसार प्रतिब्रास पाचपट दंडाच्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. – स्वप्निल रावडे तहसीलदार, मंगळवेढा

रॉयल्टी पासचा डबल वापर थांबणार

             जे नागरिक सध्या नंदुरबार येथील रॉयल्टीची वाळू खरेदी करीत आहेत. त्यांच्या पावतीवर वाळू खाली करण्याचे ठिकाण मंगळवेढा असणे गरजेचे आहे. अन्यथा इतर तालुक्याचे किवा जिल्ह्याचे नाव असलेली पावती ग्राह्य धरली जाणार नाही.

               या वाळूसाठ्यावर सुद्धा प्रतिब्रास ४० हजारांप्रमाणे दंड आकारला जाणार आहे , असे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सांगितले आहे. यामुळे रॉयल्टी पावतीच्या डबल वापराला चाप बसणार आहे.

नागरिकांचा कारवाईला विरोध

               चोर सोडून संन्याशाला फाशी म्हणी प्रमाणे कारवाई सुरू असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. या कारवाईला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.