वाळूमाफियांची मुजोरी वाढली.
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या माफियावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांना चिरडून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. कमी कष्टाच्या वाळू व्यवयासातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर ह्या वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिस हवालदार गणेश प्रभू सोनलकर (वय 32, मंगळवेढा पोलिस ठाणे) असे वाळू तस्कराच्या वाहनाखाली मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेची फिर्याद गोणेवाडीचे पोलिस पाटील संजय मेटकरी यांनी दिली आहे. त्यानुसार गाडीचा मालक, चालक आणि त्याचा साथीदार अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीनही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मंगळवेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. पिंगळे यांनी दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कमी कष्टाच्या या धंद्यातून मिळणाऱ्या पैशाच्या मस्तीमुळे वाळूतस्करांकडून वारंवार असे प्रकार केले जात आहेत. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक या धंद्यात उतरले आहेत. अनेकदा कारवाईसाठी गेलेले तलाठी, पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी यांना धमकाविण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
शिरसी गावच्या हद्दीतून चोरट्या वाळूची वाहतूक होणार असल्याची माहिती समजल्यानंतर सोनलकर हे त्या ठिकाणी पोचले होते. गोणेवाडी ते शिरसी या गावादरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या भरधाव पिकपला त्यांनी सकाळी नऊच्यादरम्यान शिरसी गावाजवळ हॅटसन डेअरीजवळील वेताळ मंदिरासमोर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने भरधाव वाहन सोनलकर यांच्या अंगावर घातले. त्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी सोनलकर यांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मंगळवेढा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाला नंबरप्लेट नाही, त्यामध्ये दोघेजण होते, त्यामधील एकजण पळून गेला असून एकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक बेरोजगार तरुणांनी महसूल व पोलीस खात्यातील काहींना हाताशी धरत वाळू व्यवसाय निवडला आहे. त्यामुळे महसूल व पोलिस खात्यातील काहींनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्याचे धाडस वाढत गेले. आज पकडण्यात आलेली वाळू माण नदीपात्रातील असल्याचा संशय असून या मार्गावरून कायमस्वरूपी छुप्या पद्धतीने वाळूची चोरटी वाहतूक होते. या मार्गावरून सांगली व कोल्हापूर भागातदेखील चढ्या दराने वाळू पुरवली जात असल्याची चर्चा आहे. या सगळ्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम आज एका पोलिस कर्मचाऱ्यास आपला जीव गमावून भोगावा लागला आहे.