फार्मर मॉल च्या सामाजिक बांधिलकीच्या परंपरेचे युवा उद्योजक सुरज साबळे यांच्याकडूनही जतन...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
फार्मर मॉल, मरवडे यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त फार्मर मॉल उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक जनार्धन शिवशरण व कार्यकारी संचालिका तथा जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण यांच्या मार्गदर्शनातून व युवा उद्योजक सुरज साबळे यांच्या संकल्पनेतून सेकंड होम इंग्लिश मेडियम स्कूल, मरवडे या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये दिसलेला उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांचे मन खरोखरच भारावून गेले होते.
यावेळी उद्योजक साबळे यांनी बोलताना सांगितले की, शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा मजबूत पाया आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणारे असे उपक्रम त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरतात. हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल फार्मर मॉल परिवाराचे यांचे शाळा प्रशासनाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. मुलांना मिळालेले हे शैक्षणिक साहित्य त्यांच्या प्रगतीसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. या उपक्रमातून फार्मर मॉल परिवाराने जी सामाजिक आणि शैक्षणिक दातृत्वाची जबाबदारी दाखवली आहे, ती खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा असून, समाजाच्या सहभागातून शिक्षणाची ही वाट अधिक बळकट होत राहो, हीच सदिच्छा.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव आबासाहेब पाटील, प्राचार्या सायली पाटील, उद्योजक वैभव मासाळ, उत्कृष्ठ निवेदक संतोष मिसाळ,उद्योजक देवनाथ जाधव, उद्योजक राहुल टोमके, विशाल गवळी, शंतनू जाधव, इंजिनियर अजित जाधव, सहशिक्षिका प्रांजली माने, प्राजक्ता साळवे, नेत्राली जाधव यांचेसह इतर मान्यवर सहकारी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूलच्या पर्यवेक्षिका शैला फराटे यांनी केले तर शेवटी श्लोक सोमनाथ टोमके या बाल विद्यार्थ्याने अक्षरशः इंग्रजी भाषेतून सर्वांचे आभार मानले.