मंगळवेढ्यात 25 बेपत्ता तरुणी शोधण्यात पोलीसांना यश ; महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांचे योगदान मोठे ...

मंगळवेढ्यात 25 बेपत्ता तरुणी शोधण्यात पोलीसांना यश ; महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांचे योगदान मोठे ...

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

 मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून सन 2020 ते 2025 मध्ये जवळपास 25 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीसात झाली होती. दरम्यान प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांनी लोकेशन व सी.डी.आर. काढून कौशल्यपुर्वक तपास करुन त्या बेपत्ता मुलींना ताब्यात घेवून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात यश आले आहे.

मंगळवेढा पोलीस प्रशासनाकडे सन 2020 ते 2025 या कालावधीत जवळपास 25 मुली बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटूंबियाने नोंदविली होती. या सर्व मुलींना लोकेशन व सी.डी.आर.च्या माध्यमातून विविध ठिकाणाहून ताब्यात घेवून डी.वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी डॉ.आरती कणिरे यांनी पोलीस स्टेशनला आणून सर्व पालकांच्या ताब्यात दिले. हा तपास करीत असताना प्रत्येक गावच्या पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले. 

सन 2026 मधील 19 वर्षीय मुलगी शहर परिसरातून बेपत्ता झाली होती. हिचाही लोकेशन व सी.डी.आर.च्या माध्यमातून शोध घेतला असता सदरची 19 वर्षीय मुलगी व 21 वर्षाचा एक तरुण हे दोघे आळंदी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आळंदी येथे विवाह केला होता. त्या दोघांना ताब्यात घेवून ते सुज्ञ असल्यामुळे त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले. तर दुसर्‍या घटनेत शहर परिसरातून बेपत्ता झालेली 20 वर्षीय मुलगी मोहोळ हद्दीत सापडली. तिला ताब्यात घेवून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. तिसर्‍या घटनेत शहर परिसरातील एक 35 वर्षीय विवाहिता आपल्या तीन लहान मुलांसह बेपत्ता झाली होती. तिचे लोकेशन इंदापूर येथे मिळून आले. तपास अंमलदार यांनी याबाबत अधिक चौकशी केली असता सदर विवाहितेस मोबाईल हवा होता, पती मोबाईल घेवून देत नसल्यामुळे रागाच्या भरात निघून गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पती मोबाईल देत नसल्यामुळे वारंवार पती-पत्नीत भांडणे सुुरु होती. याला कंटाळून विवाहिता मुलांना घेवून निघून गेली होती. शनिवार पेठ येथील एक 22 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती. तिचेही लोकेशन काढून तिलाही ताब्यात घेवून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. माचणूर परिसरातून ऊसतोड टोळीतील एक तरुणी कोप्यावरुन बेपत्ता झाली होती. यामुलीचे लोकेशन काढल्यानंतर तिचे लोकेशन लातुर येथे निघाले. 

सदर मुलीने पोलीस अधिकार्‍यास व्हिडीओ कॉल करुन मी ऊसतोड टोळीतील एका मुलाशी लग्न केले असून मी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली होती. दोघेही सुज्ञ असल्यामुळे त्या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मंगळवेढा पोलीस ठाण्याला गेली अनेक वर्षे महिला पोलीस अधिकारी नसल्यामुळे महिला विषय गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी अडचणी येत होती. मागील महिन्यात वार्षिक तपासणी प्रसंगी सोलापूरचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी हे मंगळवेढ्यात आले होते. 

यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधिक्षकाकडे एक महिला पोलीस अधिकारी नेमण्याची आग्रहाची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांची नेमणूक मंगळवेढ्याला केली आहे. दरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यभार स्विकारताच बेपत्ता मुलींच्या तपासाला गती देवून बेपत्ता मुली शोधून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात यश मिळाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.