नागपंचमीच्या निमित्ताने महिलांचा जल्लोष; भव्य महिला खेळ महोत्सवाचे आयोजन...
जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे व पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी पारंपरिक खेळ, झोका व हळदी-कुंकू समारंभ...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
नागपंचमीच्या मंगल पर्वानिमित्त बोराळे गावातील महिला भगिनींच्या आनंदाला नवी उंची देण्यासाठी पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री कवचाळे यांच्या पुढाकारातून भव्य “नागपंचमी विशेष महिला खेळ महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नूतन हायस्कूल, बोराळे येथे हा उत्साहपूर्ण कार्यक्रम रंगणार आहे.
नागपंचमी म्हणजे आपल्या संस्कृतीतील परंपरा, उत्साह आणि आनंदाचा सण. या परंपरेला आधुनिक सामाजिक सहभागाची जोड देत महिलांना एकत्र आणणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून काही आनंदाचे क्षण मिळवून देणे आणि महिला सक्षमीकरणाच्या भावनेला बळ देणे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात विविध पारंपरिक व मनोरंजनात्मक महिला खेळ, झोका, हळदी-कुंकू समारंभ तसेच विजेत्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने बोराळे येथे महिलांचा उत्साह आणि आनंदाचा माहोल निर्माण होणार आहे.
महिलांसाठी उपक्रमांची सातत्यपूर्ण परंपरा...
पंचायत समिती सदस्या सौ.जयश्री कवचाळे यांच्या पुढाकारातून बोराळे परिसरातील महिलांसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात आले आहेत. नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, महिला दिनाचे कार्यक्रम, श्रावण महिन्यातील देवदर्शन यात्रा यांसह महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम त्यांनी आयोजित केले आहेत.
महिलांना केवळ घराच्या चौकटीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना सामाजिक जीवनात सक्रिय सहभागाची संधी मिळावी परस्परांमध्ये संवाद व आपुलकी वाढावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे या भूमिकेतून हे उपक्रम राबविले जात असल्याचे जयश्री कवचाळे यांनी सांगितले.
या महिला खेळ महोत्सवासाठी लोकप्रिय आमदार माननीय श्री समाधान दादा अवताडे व महिला नेत्या सौ.अंजलीताई अवताडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पंचायत समिती सभापती सौ दिपाली ताड, उपसभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य व सर्व पंचायत समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमामुळे बोराळे गावातील महिलांना एकत्र येऊन खेळ मनोरंजन संवाद आणि संस्कृती परंपरेचा आनंद घेण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे.