संभाजी ब्रिगेडचा सोलापूर पोलीस अधीक्षकांना इशारा; मंगळवेढा शहर व तालुक्यात अवैध धंदे रोखण्याची मागणी...
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
मंगळवेढा शहर आणि संपूर्ण तालुक्यात अवैध दारू विक्री, मटका आणि जुगाराचे धंदे खुलेआम सुरू असून यामुळे तरुण पिढी आणि महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनापूर्वी (१५ ऑगस्ट) हे सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी मंगळवेढा ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे मंगळवेढा शहराध्यक्ष आण्णासाहेब सोपान पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
लहान पानटपऱ्या आणि मंदिरांच्या परिसरात मटका एजंट सक्रिय निवेदनात नमूद केल्यानुसार, मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागात छोट्या पानटपऱ्या तसेच गावागावांतील मंदिरांच्या परिसरात एजंटमार्फत मटक्याचे जाळे पसरले आहे.
अवैध धंद्यांमुळे तरुण वर्ग जुगाराच्या आहारी गेला असून ४० टक्के टक्क्याने आठवडा व्याजावर पैसे उचलले जात आहेत. यामुळे तरुण पिढी दारू आणि जुगाराच्या विळख्यात सापडली असून सामाजिक स्वास्थ बिघडत आहे.
स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा अवैध धंद्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
१५ ऑगस्टपूर्वी यावर कठोर कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा पवित्रा संभाजी ब्रिगेडने घेतला आहे.
या निवेदनाच्या प्रती मंगळवेढा पोलीस उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा तहसीलदार आणि मंगळवेढा ग्रामीण पोलीस ठाणे यांनाही माहितीस्तव सादर करण्यात आल्या आहेत.