मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान...
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
रक्तदान केवळ दान नव्हे, तर मानवतेच्या रक्षणासाठी केलेले महान कार्य आहे.अशी शिबीरे म्हणजे सेवाभाव, समर्पण आणि समाजहिताचा विधायक उत्सव असल्याची भावना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आंधळगाव येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
मंगळवेढा शहर व चारही जिल्हा परिषद गटात संबंधित जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापती दिपाली ताड आणि सदस्य यांच्या सहकार्यातून लक्ष्मी दहिवडी गटातील आंधळगाव येथे ३२१, दामाजीनगर गटातील अरळी येथे १२६, हुलजंती गटातील मरवडे येथे ९० तर भोसे गटातील भोसे येथे १०६, मंगळवेढा ५० असे एकूण ६९३ रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे रक्तदान करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस अर्थात आपल्या लाडक्या देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा खरा उत्सव साजरा करण्यात आला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे आपण म्हणतो. कारण, आपल्या एका कृतीने असंख्य नागरिकांना जीवनदान देण्याची क्षमता यात आहे. केवळ दान नव्हे, तर मानवतेच्या रक्षणासाठी केलेले महान कार्य म्हणजे रक्तदान याच भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या रक्तदानासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, सदस्या करुणा शिवशरण, सदस्य रमेश भांजे, सदस्या संगीता दुधाळ त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य विनायक यादव, सदस्या जयश्री कवचाळे, मोहिनी गणपाटील यांच्या आयोजनातून भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी कृतीतून सिद्ध केली.
रक्ताचा प्रत्येक थेंब एखाद्या गरजूला नवजीवन देऊ शकतो, हीच भावना प्रत्येक रक्तदात्याच्या चेहऱ्यावर आणि कृतीतून स्पष्टपणे दिसून आली. वाढदिवस केवळ शुभेच्छांनी नव्हे, तर समाजोपयोगी कार्याने साजरा करण्याचा आदर्श या उपक्रमातून घालून देण्यात आला.
या प्रेरणादायी उपक्रमासाठी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे तसेच आयोजन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले भाजपा पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.
कोट :-
राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आणि त्यांच्या धोरणात्मक प्रेरणेतून लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटांमध्ये विक्रमी रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक बांधिलकी सोहळ्यासाठी अनमोल आणि अभूतपूर्व असे योगदान देत ऐतिहासिक रक्तदानाचा टप्पा पार केला आहे. यापुढील काळातही असे विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार आवताडे यांचे विचार व भारतीय जनता पार्टीचे ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
- करुणा शिवशरण
(जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी दहिवडी गट)