झाडे तोडून रस्ता खुला करावा ही मागणी,अन्यथा रस्ता बंद इशारा...
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी ते ढवळस हा ३ किलोमीटर मार्गावर काटेरी झुडपांचे साम्राज्य वाढल्याने रस्ताच गायब झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत असून वाहन चालकांना मोठी कसरत करत या रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत. दरम्यान संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी या रस्त्यावरील काटेरी झुडपे तात्काळ तोडून हा मार्ग प्रवासासाठी मोकळा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हेंबाडे यांनी केली.
मल्लेवाडी ते ढवळस हे ३ किलोमीटर अंतर असून या मार्गावर डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी फिरंगीची मोठी झुडपे, रस्त्यावर बांधलेली जनावरे, रस्त्याच्या कडेला लावलेला जनावरांच्या चाऱ्याच्या कडब्याच्या ढेपणी असल्याने या रस्त्याला बोगद्यासारखे चित्र प्राप्त झाले आहे. हा संत दामाजी कारखाना जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे रात्रंदिवस या रस्त्यावरून वाहतूक सुरू असते.पुढे अनेक गावांना जाण्याचा हा मार्ग आहे.
काटेरी वाढलेल्या झुडपामुळे समोरून आलेले वाहन वाहन चालकाला दिसत नाही, समोरून मोठे वाहन आल्यानंतर मोटारसायकल,पायी चालणाऱ्या शाळकरी मुला मुलींना जीव मुठीत धरून फिरंगीच्या झाडाचा आधार घ्यावा लागतो,परिणामी अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये या अगोदरच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी तात्काळ झाडे तोडून हा रस्ता खुला करावा, अन्यथा काटेरी झाडे तोडून रस्त्यावर टाकून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हेंबाडे व ढवळस ग्रामस्थ यांनी दिला आहे.