तीन दशकांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळाले यश; मंगळवेढा तालुक्यात जल्लोष, अभिनंदनाचा वर्षाव...
मंगळवेढा / प्रतिनिधी:-
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर या छोट्याशा गावातून संघर्षाची वाट चालत महाराष्ट्र पोलीस दलात स्वतःचा ठसा उमटवणारे मनोजकुमार माधवराव यादव यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मारापूर गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मनोजकुमार यादव हे मंगळवेढा पंचायत समितीचे सदस्य तथा मारापूरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांचे ज्येष्ठ बंधू, तसेच शरदचंद्र कृषी विद्यालयाचे संस्थापक सचिव व मारापूरचे माजी सरपंच माधवराव यादव यांचे सुपुत्र आहेत. समाजसेवा, शिक्षण आणि ग्रामीण विकासाचा वारसा लाभलेल्या यादव कुटुंबात त्यांचे बालपण घडले. शेतीशी घट्ट नाळ जोडलेल्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली आणि त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर यशाची शिखरे गाठली.
गेल्या सुमारे तीन दशकांच्या सेवाकाळात त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी जबाबदारीची पदे समर्थपणे सांभाळली. कायदा व सुव्यवस्था राखणे, संवेदनशील गुन्ह्यांचा छडा लावणे, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपक्रम राबविणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये ठरली. धडाकेबाज कारवाई, गुन्हेगारांवर प्रभावी वचक आणि नागरिकांशी जिव्हाळ्याने संवाद साधण्याची त्यांची शैली यामुळे त्यांची 'खाकी वर्दीतील माणूस' अशी वेगळी ओळख निर्माण झाली.
पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुंतागुंतीचे गुन्हे यशस्वीपणे उघडकीस आणले. त्यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि परिणामकारक कार्याची दखल घेत शासनाने सोलापूरसारख्या मोठ्या व संवेदनशील शहरातील महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या सोलापूर शहरासमोर वाहतूक, सायबर गुन्हेगारी, वाढती लोकसंख्या आणि कायदा-सुव्यवस्थेची अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अनुभवी आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून मनोजकुमार यादव यांची नियुक्ती झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना मनोजकुमार यादव म्हणाले, "गुन्हेगारीला आळा घालणे, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे आणि नागरिकांना सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देणे, हेच माझे सर्वोच्च प्राधान्य असेल."
कर्तव्यदक्ष सेवेसाठी त्यांना आतापर्यंत विविध शासकीय, निमशासकीय आणि सामाजिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीची बातमी मारापूरमध्ये पोहोचताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी पेढे वाटून ग्रामस्थांनी जल्लोष केला. "शरदचंद्र कृषी विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या माधवराव यादव यांच्या घरातील सुपुत्र आज एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी वडिलांचा समाजसेवेचा वारसा खाकी वर्दीतून पुढे नेला," अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
लोकनियुक्त सरपंच विनायक यादव म्हणाले, "माझ्या मोठ्या भावाचे हे यश प्रत्येक ग्रामीण तरुणासाठी प्रेरणादायी आहे. वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या बळावर त्यांनी हे स्थान मिळवले असून, संपूर्ण कुटुंबासह गावाला त्यांचा सार्थ अभिमान आहे."
मारापूरच्या मातीतून घडलेला हा अधिकारी आज सोलापूर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार असल्याने मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या रूपाने सोलापूर पोलीस दलाला एक अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी लाभल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.