छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त घरनिंकी गावात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे भव्य मोफत प्रदर्शन...

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त घरनिंकी गावात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे भव्य मोफत प्रदर्शन...

मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

 स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा जागर करण्यासाठी घरनिंकी गावात एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तमाम मराठा समाज व समस्त घरनिंकी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने घरनिंकी गावातील हनुमान मंदिर परिसरात शुक्रवार, दि. 15 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तरुण पिढीला छत्रपतींचा इतिहास व विचारांची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
घरनिंकी गावातील हनुमान मंदिर परिसरात या कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. गावातील युवक मंडळे, महिला बचत गट व जेष्ठ नागरिक या सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रमाची जबाबदारी उचलली आहे. खुल्या मैदानात भव्य पडद्याची व अत्याधुनिक डिजिटल साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात येत आहे. घरनिंकी गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व प्रकाशाची योग्य सोय करण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.राजा शिवाजी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक जीवनकार्याचा आणि संघर्षाचा जिवंत दस्तऐवज आहे. रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी केलेला अथक परिश्रम, गनिमी कावा आणि प्रजाहितदक्ष कारभार या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. आयोजकांनी सांगितले की, एक इतिहास... जो आजही प्रेरणा देतो! हा चित्रपट घरनिंकी गावातील प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून पाहावा, अशी आमची इच्छा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र पर्वावर घरनिंकी गावात हा चित्रपट दाखवणे म्हणजे त्यांच्या शौर्याला व बलिदानाला दिलेली खरी आदरांजली ठरेल.

घरनिंकी गावात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भगवे ध्वज व स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत. हिंदवी स्वराज्य अमर राहो! छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज अमर राहें! अशा जयघोषाने घरनिंकी गाव दुमदुमून जाणार आहे.

 या उपक्रमातून सामाजिक सलोखा व एकोपा वाढीस लागावा, हाच हेतू असल्याचे संयोजकांनी सांगितले.आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, चला तर मग... स्वराज्याच्या या गाथेचा अभिमान अनुभवा! घरनिंकी गावात विनामूल्य!या भव्य चित्रपट प्रदर्शनाला पंचक्रोशीतील बांधवांनी, महिला-भगिनींनी व युवकांनी मोठ्या संख्येने घरनिंकी गावात उपस्थित राहावे.छत्रपतींचा इतिहास केवळ पुस्तकात न राहता तो प्रत्येकाच्या मनात रुजावा, यासाठी हे पाऊल उचलल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. 

दिनांक:15 मे 2026, शुक्रवार सायंकाळी 7 वाजता ठीक हनुमान मंदिर परिसर, घरनिंकी गाव सर्वांसाठी विनामूल्य तमाम मराठा समाज व समस्त घरनिंकी ग्रामस्थ तरी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी वेळेवर घरनिंकी गावात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.