मंगळवेढा/प्रतिनिधी :-
तालुक्यातील मारापूर येथे मान नदीपात्रातून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व कर्मचाऱ्यांना धमकी देणाऱ्या इसमाविरुद्ध ग्रामपंचायत मारापूर यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनला धाव घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली आहे.
पंचायत समिती सदस्य विनायक यादव यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जानुसार, गावातील यशवंत सुभाष कोळी हा मागील महिन्याभरापासून रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत ट्रॅक्टर व पिकअपच्या साहाय्याने मान नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करत आहे.
अवैध वाहतूक रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यांवर आरोपी कापड झाकून वाळू चोरी करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कृत्यात कॅमेऱ्यांचे अंदाजे 25 हजारांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचे CCTV फुटेज पेन ड्राईव्हमध्ये पुरावा म्हणून पोलिसांना सादर करण्यात आले आहे.
मध्यरात्री ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यशवंत कोळी यास हटकले असता, त्याने MH 13 DE 7923 या चारचाकी वाहनाने अंगावर घालण्याची धमकी देऊन वाहने घेऊन पसार झाल्याचे अर्जात म्हटले आहे.
यशवंत कोळी व त्याच्या साथीदारांविरुद्ध चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व जीवे मारण्याची धमकी प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, तसेच वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करावीत, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
*"प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कडक कारवाई करावी. नदीपात्राचे व गावाचे नुकसान थांबवावे, अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन करू" - राजकुमार यादव, चेअरमन वि.सेवा.सोसायटी, मारापूर