दिव्यांग भावाची थट्टा करणाऱ्यांना जाब विचारला म्हणून १८ वर्षीय सुजितची मित्रानीच केली निर्घृण हत्या;लमाणतांडा येथील घटनेने मंगळवेढा तालुका हादरला, आरोपी अटक, उर्वरित आरोपी फरार, पोलिस तपास वेगाने सुरू...

दिव्यांग भावाची थट्टा करणाऱ्यांना जाब विचारला म्हणून १८ वर्षीय सुजितची मित्रानीच केली निर्घृण हत्या...

लमाणतांडा येथील घटनेने मंगळवेढा तालुका हादरला, आरोपी अटक, उर्वरित आरोपी फरार, पोलिस तपास वेगाने सुरू...

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

भांडण सोडवण्यासाठी आणि आपल्या अपंग भावाची बाजू घेण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील बाजीनगर लमाण तांडा येथे घडली आहे.

सुजित सुभाष राठोड (वय १८) असे या मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजित राठोड याचा भाऊ रणजित हा दिव्यांग (अपंग) आहे. सोमवारी (दि. २०) संशयित आरोपी शशिकांत पवार हा रणजितची चेष्टा-मस्करी करत होता. यातूनच त्यांच्यात वाद झाला आणि शशिकांतने रणजितला मारहाण करण्यास सुरुवात केली.

आपल्या भावाला मारहाण होत असल्याचे पाहून सुजित तिथे पोहोचला आणि त्याने आरोपींना जाब विचारला.

याचा राग धरून शशिकांत पवार, आशिष पवार आणि सागर राठोड या तिघांनी सुजितला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुजितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडला होता.

उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली...

जखमी सुजितला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती खालावत गेली आणि बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऐन उमेदीच्या वयात सुजितचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


पोलीस कारवाई आणि सद्यस्थिती...

या घटनेनंतर सुजितचे वडील सुभाष राठोड यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून: लमाणतांडा, बालाजीनगर येथील
सागर राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे.
शशिकांत पवार आणि आशिष पवार हे सर्व लमाणतांडा, बालाजीनगर येथील दोन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मंगळवेढा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सुजितचे पार्थिव नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणले होते. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात असे लेखी आश्वासन दिल्यानंतर पार्थिव बालाजीनगर येथे नेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.