तक्रार प्रलंबित असताना वीज पुरवठा खंडित करू नये - पंचायत समिती सदस्य विनायक यादव
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
तालुक्यातील वीज ग्राहकांना चुकीच्या वीज बिलांच्या दुरुस्तीसाठी वारंवार तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही धावपळ थांबवून संबंधित गावातच महावितरण अधिकाऱ्यांनी बिल दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य विनायक यादव यांनी केली आहे.
याशिवाय, ज्या ग्राहकांना त्यांच्या सरासरी वीज वापरापेक्षा जास्त बिल येत आहे, त्यांनी तक्रार अर्ज केल्यानंतर त्या अर्जाचे निरसन होईपर्यंत त्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये, अशीही त्यांनी ठाम भूमिका मांडली आहे.
तालुक्यात काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त व चुकीची वीज बिले येत असल्याच्या तक्रारी वाढत असून, सामान्य नागरिकांना यासाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे अधिक कष्टदायक ठरत आहे. त्यामुळे महावितरणने ग्राहकाभिमुख भूमिका घेत गावपातळीवरच समस्या सोडवण्याची गरज असल्याचे यादव यांनी नमूद केले.
दरम्यान, आमदार समाधानदादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या व वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांवर महावितरण अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीत नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहितीही विनायक यादव यांनी दिली.महावितरणने या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकट :-
“वीज ही मूलभूत गरज असून ग्रामीण भागातील नागरिकांना केवळ चुकीच्या वीज बिलासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणे अत्यंत कष्टदायक ठरत आहे. ग्राहकांना हेलपाटे मारायला लावण्याऐवजी महावितरणने ग्राहकाभिमुख भूमिका घेत प्रत्येक गावातच या समस्या सोडवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच तक्रार प्रलंबित असताना त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नये.”
— विनायक यादव
पंचायत समिती सदस्य, मंगळवेढा.