नंदेश्वर येथील या घटनेने मंगळवेढा तालुक्यात खळबळ...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील मोटेवस्तीमध्ये कौटुंबिक वादातून घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दारूच्या व्यसनामुळे सतत त्रस्त असलेल्या कुटुंबात अखेर मोठ्या भावाचा लहान भावाकडून कुऱ्हाडीने वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाळू धोंडीबा मोटे (वय ६०) हे आपल्या पत्नी, मुले, सूना आणि नातवंडांसह शेतातील मोटेवस्ती येथे वास्तव्यास आहेत. दि.१० एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सूमारास कृष्णात हा दारूच्या नशेत घरी आला आणि नेहमीप्रमाणे घरातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने स्वतःच्या मुलालाही मारहाण केली. कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास वाद पुन्हा उफाळून आला. संतप्त अवस्थेत कृष्णातने घरातील कुऱ्हाड उचलून कुटुंबीयांना धमकावण्यास सुरुवात केली. या परिस्थितीत घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी लहान भाऊ दत्तात्रय मोटे (वय २५) याचा संयम सुटला. त्याने कृष्णातच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि रागाच्या भरात त्याच्यावर डोक्यावर तसेच दोन्ही पायांवर जोरदार वार केले.
या हल्ल्यात कृष्णात गंभीर जखमी झाला आणि त्याच्या डोक्यातून व पायांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. तातडीने कुटुंबीयांनी त्याला खाजगी वाहनाने मंगळवेढा येथील सार्ड समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने पूढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, कुटुंबीयांनी त्याला सांगोला येथील सदगुरु हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेमुळे नंदेश्वर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचा झालेला हा दुर्देैवी अंत सर्वांच्या मनाला चटका लावणारा ठरला आहे. गावकऱ्यांमध्येही या
घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान,पोलिसांनी या प्रकरणात पूढील तपास सुरू केला.
कृष्णातच्या दारूच्या व्यसनामुळे कुटुंबीय प्रचंड त्रस्त...
कृष्णात मोटे हा काही वर्षापूर्वी पुणे येथे रोजगारासाठी गेला होता. मात्र, कोरोनाच्या काळात तो गावाकडे परतला आणि त्यानंतर त्याला दारूचे व्यसन लागले.गेल्या चार वर्षापासून त्याच्या या व्यसनामुळे सपूर्ण कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.कृष्णात हा दररोज मद्यप्राशन करून घरी येत असे आणि पत्नी, मुले तसेच आई-वडिलांवर शिवीगाळ व मारहाण करत असे. कुटुंबीयांनी अनेक वेळा त्याला नशामुक्ती केंद्रात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तयार झाला नाही. त्याच्या या वागणुकीमुळे त्याची पत्नी मुलांसह माहेरी निघून गेली होती,तर लहान भाऊ दत्तात्रय काही काळ घरापासून दूर राहत होता.